पदे मिळाली, त्यांची गरज सरली!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

दिल्ली आंदोलनातील जुन्या सहकाऱ्यांबद्दल अण्णांची खंत
राळेगणसिद्धी - दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरील आंदोलनात माझ्याबरोबर बसलेले, माझ्या मागे-पुढे करणारे आता पदे मिळाल्याने माझ्या संपर्कात नाहीत. ते आता माझ्याशी बोलतही नाहीत. त्यांना माझी गरज राहिली नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना अण्णांना, "लोकपाल कायद्यासाठी आंदोलन झाले, तेव्हा तुमच्याबरोबर असलेले आज का नाहीत,' असे विचारले. त्यावर ते म्हणाले, 'अनेक जण माझ्याबरोबर होते. पद मिळाल्यामुळे त्यांना आता माझी गरज उरली नाही. माझा फायदा अशा प्रकारे कोणाला झाला, तर त्याला मी काय करू?''

पाकिस्तानच्या घुसखोरीबाबत हजारे म्हणाले, 'पाकिस्तान सतत घुसखोरी करीत असेल, तर एकदा 1965सारखे चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. पाकिस्तानबरोबर लढण्याची वेळ आलीच, तर चालक म्हणून दारूगोळा थेट सीमेवर घेऊन जाईन.''

मोदी फक्त बोलतात; त्यांनी कृती करावी, असा सल्ला देऊन हजारे म्हणाले, 'नवीन सरकारला विचार करण्यास वेळ मिळावा म्हणून आम्ही तीन वर्षे लोकपालच्या अंमलबजावणीस मुदत दिली होती. ती आता संपत आली आहे. सरकारला जाग आली नाही, तर पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करावे लागेल.''