विनियोजन विधेयकासाठी भाजप राज्यपालांच्या दारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - विधिमंडळात विनियोजन विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला मंजुरी मिळते; मात्र विधान परिषदेत विरोधकांचे बहुमत असल्याने या संबंधातला प्रस्ताव अद्याप मांडलाही गेलेला नाही. परिषदेने स्वीकारलेल्या या अडवणुकीच्या धोरणातून मार्ग सुचवा, ही विनंती करण्यासाठी सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यपालांची भेट घेणार आहेत. भाजपचे मंत्री उद्या यासंबंधात राजभवनात सी. विद्यासागर राव यांना भेटतील. सभापती रामराजे निंबाळकर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी विनंतीवजा अपेक्षाही व्यक्‍त करण्यात येते आहे.

परिषदेत सतत सुरू असलेल्या गोंधळामुळे विनियोजन विधेयक मांडले गेलेले नाही. ते नाकारले गेले तरी विधानसभेत पुन्हा मंजूर करता येते, मात्र मांडलेच न गेल्याने पेच निर्माण झाला आहे. विधानसभेने विनियोजनाला परवानगी दिल्यानंतर ते विशिष्ट कालावधीत परिषदेने मंजूर किंवा नामंजूर करायचे असते. सध्या निर्माण झालेली कोंडी लक्षात घेता आता राज्यपालांना साकडे घालण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Appropriations Bill, BJP door of the governor's