आरतीचा मृत्यू सासरच्या छळामुळेच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

कोल्हापूर - "आरती पाटील मृत्यू प्रकरणाचा तपास सुरवातीपासून चुकीच्या दिशेने होत असून, आरतीने आत्महत्या केली नसून तिचा सासरच्या छळामुळेच तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून इतक्‍या गंभीरप्रकरणी उच्चाधिकारी नियुक्त केलेला नाही. या घटनेला आत्महत्येचे वळण लावले गेले आहे. मला सर्वसामान्यांनी आधार दिला; पण पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य, थोडीशी देखील सहानुभूतीपूर्ण वागणूक मिळालेली नाही', अशा शब्दात आरती पाटील-सावकार यांचे वडील भगवान पाटील यांनी खेद व्यक्त केला. 

आरतीचा सासरी छळ झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, आरतीसारखा मृत्यू अन्य कोणा मुलीच्या किंवा महिलेच्या वाट्याला येऊ नये, यासाठी विविध संस्था, संघटनांतर्फे आज शहरातून कॅन्डल मार्च काढला. या वेळी श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. 

श्री. पाटील यांची उच्चशिक्षित कन्या आरती हिचा विवाह काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील गौरव याच्याशी झाला. लग्नानंतर सोन्याचे कडे केले नाही, यावरून आरतीचा सासरी छळ सुरू झाला. याला कंटाळून आरतीने आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद सातपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली; 

पण आरतीची आत्महत्या नसून सासरच्या छळामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा दावा पाटील कुटुंबीयांनी केला आहे. 

छळाला कंटाळून आरतीला जीव गमवावा लागला. चिड आणणाऱ्या या घटनेबद्दल खेद व्यक्‍त करण्यासाठी शहरातील व्यक्ती, संघटनांनी कॅन्डल मार्च काढला. आरतीला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मूक मागणी उपस्थित सहभागींनी या कॅन्डल मार्चद्वारे केली. यात तरुण, तरुणी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शिवाजी पुतळ्यावरून सुरू झालेला कॅन्डल मार्च पापाची तिकटी, पानलाइन, महापालिका, भाऊसिंगजी रोड, टाऊन हॉलमार्गे दसरा चौकात आला. 

या वेळी संदीप नेजदार, वसंत मुळीक, संजय पवार, बाबा इंदुलकर, विशाल रसाळ, समीर पाटील, रणजित भोसले, मनोज फराकटे, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते. 

तीव्र शब्दांत नाराजी 
कॅन्डल मार्चमध्ये काळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले तरुण, तरुणी आणि महिला सहभागी झाल्या. अनेकांच्या हातात आरतीला न्याय मिळावा, पुन्हा इतर महिला, युवतींच्या वाट्याला असा छळ येऊ नये, अशी साद घालणारे फलक, तसेच आरतीचे छायाचित्र असलेली पत्रके सहभागींच्या हाती होती. काहींनी आरतीवर झालेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दसरा चौकात सर्वांनी मेणबत्त्या प्रज्वलीत केल्या.

Web Title: arati patil murder case