पुरातत्व खात्याच्या जोखडातून किल्ले मुक्‍त करा - उद्धव

पुरातत्व खात्याच्या जोखडातून किल्ले मुक्‍त करा - उद्धव

मुंबई - केंद्रीय पुरातत्व खात्याच्या जोखडातून राज्यातील गड-किल्ले मुक्‍त करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर बांद्रा-कुर्ला संकुल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यातील गड-किल्ले म्हणजे इतिहासाचा ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांची डागडुजी करता येत नाही. राज्यात शिवसेना व भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केंद्राच्या जोखडातून हे किल्ले मुक्‍त करून राज्याच्या ताब्यात द्यावेत, त्यांची दुरुस्ती करण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमात मुंबईसाठी अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले. मुंबईकरांसाठी अतिशह महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरणाची परवानगी तातडीने देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प होत असले तरी मुंबईकरांसाठी विरंगुळ्याची जागा नाही. मुंबईच्या पूर्व किनारपटीवर बीपीटी आणि नवदलाची मोठी जमीन आहे. यापैकी काही जमीन उपलब्ध झाल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर यांच्या स्मारकांसह मनोरंजन केंद्र उभारण्यात येईल, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

सभेत घोषणा युद्ध
पंतप्रधानांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जाहीर सभेदरम्यान - शिवसेना भाजपमधील वाक्‌युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुभवले. दोन दिवसांपूर्वी राम मंदिर रेल्वेस्थानकाच्या उद्‌घाटनप्रसंगी झालेल्या दोन पक्षातील वादाची धग अद्याप शमली नसल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागतपर भाषण सुरू असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी "मोदी, मोदी' अशा घोषणांचा नारा सुरू केला असता शिवसैनिकांनी " वाघ आला रे वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. या घोषणाबाजीमुळे सभेत व्यत्यय निर्माण झाला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले. "छत्रपतींचे खरे मावळे असाल तर शांत रहा", असे आवाहन त्यांनी केल्यानंतर काही प्रमाणात शांतता निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांनी भाषणास सुरवात करतानाही शिवसैनिकांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. या वेळी मोदींच्या नावाचा भाजप कार्यकर्त्यांनी जयजयकार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com