कॉंग्रेसमध्ये चव्हाण-राणे संघर्ष पेटणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मार्च 2017

माजी खासदार नीलेश राणे यांचे वादग्रस्त ट्‌विट

माजी खासदार नीलेश राणे यांचे वादग्रस्त ट्‌विट
मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढण्याची तयारी पूर्ण केली असताना, कॉंग्रेसमध्ये मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी खासदार नीलेश राणे यांच्यातला संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरीत कॉंग्रेसला जिल्हा परिषदेत सपशेल पराभव स्वीकारावा लागल्याने नीलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले आहे. सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज पुन्हा चव्हाण यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करत वादाला तोंड फोडले आहे.

नीलेश राणे यांनी "अशोक चव्हाण बेपत्ता आहेत,' असे वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्‌विटमध्ये नीलेश यांनी अशोक चव्हाण यांचा फोटो पोस्ट करताना त्याखाली "बेपत्ता, नाव : अशोक चव्हाण, वय : 58 , स्टेटस : शरीर आहे, पण काम बेपत्ता,' असे स्पष्टपणे लिहिले आहे.

सरचिटणीसपद सोडताना नीलेश यांनी गेली दीड वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष नेमता आला नाही.

रत्नागिरीमध्ये कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्षच नसल्याने पराभव झाला. या पराभवाला चव्हाण यांची कार्यपद्धतीच जबाबदार असल्याची टीका केली होती. कॉंग्रेसचा कारभार अशा पद्धतीने चालणार असेल, तर पक्षात काम करणे जमणार नाही, असे निलेश राणे यांनी या अगोदरच स्पष्ट केले होते. आज नव्याने वादग्रस्त ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या विरोधातली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

चंद्रकांत पाटलांची गुगली...
नारायण राणे हे प्रत्येक पक्षाला हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व असल्याची गुगली टाकत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्राकांत पाटील यांनी राजकीय चर्चेला उधाण देण्याचा प्रयत्न केला आहे. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील यांनी हे सूचक विधान केले. राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्षच घेतील. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून कोणताही नेता भाजपमध्ये येत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे स्पष्ट करत पाटील यांनी नव्या राजकीय चर्चेला वाट मोकळी करून दिली.

Web Title: ashok chavan nilesh rane disturbance