लहानग्यानं आणलाय मोठेपणाचा तोरा...

अशोक सुरवसे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

राम आणि रावण या दोन प्रवृत्ती म्‍हणून आपण मान्‍य केल्‍या आहेत. त्‍यातला एक सत्‍प्रवृत्तीचं तर दुसरा दुष्‍प्रवृत्तीचं प्रतिनिधीत्‍व करतो.... राजकारणाच्‍या पटावर सत्ताधा-यांना नेहमीच रावणाच्‍या भूमिकेत चितारण्‍याचा प्रयत्‍न विरोधात असलेल्‍या आणि स्‍वतःला राम समजणा-या विरोधकांकडून होत असतो... पण महाराष्‍ट्रातलं चित्र तसं नाही... महाराष्‍ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार आहे... दोघंही सत्तेचे समान भागीदार आहेत... तरीही काँग्रेस-राष्‍ट्रवादी या विरोधकांपेक्षा सत्तेतले हे भागीदारच भांडत सुटले आहेत...

काल-परवापर्यंत राज्‍यात मोठा भाऊ असलेल्‍या शिवसेनेकडं लहानग्‍याची भूमिका आल्‍यापासून तर हा लहानगा खूपच बिथरला आहे.... पण आपलं हे बिथरणं लहानपण आल्‍यानं नाही, तर रयतेची कामं मार्गी लागत नसल्‍यानं असल्‍याचं वारंवार सांगण्‍याचा प्रयत्‍न हा लहानगा करतोय.... त्‍यासाठी त्‍याला कसलंही निमित्त पुरेसं ठरतं... आता अलिकडच्‍या काही दिवसात तर हा लहानगा घरातला आहे की शेजारचा आहे, अशी शंका येण्‍याइतपत हे भांडण ताणलं गेलंय.... त्‍यामुळं हा लहानगा घराच्‍या वाटणीतला हिस्‍साही सोडून देण्‍याच्‍या मूडमधे असल्‍याचं वातावरण तयार झालेलं आपल्‍याला पाहायला मिळालं... रयतेसाठी वाट्टेल ते करण्‍याची तयारी असल्‍याचं हा लहानगा वारंवार सांगतोय... त्‍यासाठी घराबाहेर पडण्‍याच्‍या निर्णयापर्यंत येऊन ठेपल्‍याचंही आवर्जून सांगतोय.... पण त्‍यासाठीचा मुहूर्त मात्र या लहानग्‍याला सापडलेला दिसत नाही....

आज दसरा.... दस-याच्‍या संध्‍याकाळी आपण रावण दहन करतो.... आणि रावण कसा दुष्‍ट होता, नालायक होता, दुराचारी होता, हे समोरच्‍यांना पटवून देतो... लहानगाही गेल्‍या पन्‍नास वर्षांपासून हेच करत आलाय.... आता अलिकडच्‍या अडीच-तीन वर्षाचा काळ सोडला तर लहानगा.... लहानगा नव्‍हता...तो मोठा होता...त्‍यामुळं तो आदेश सोडायचा आणि आपल्‍याला हवं ते करुन घ्‍यायचा.... मात्र, आता भूमिका बदलली आणि आदेशाच्‍या ठिकाणी सूचना, विनंती आणि अति झालं तर इशारे, तेही तोंडातल्‍या वाफेला मोकळी वाट करुन देणारे....असं चित्र दिसायला लागलंय.... लहानाचं मोठं होणं सोपं असलं तरी मोठ्याचं लहान होणं खूपच त्रासदायक असतं... याचाच अनुभव आजचा हा लहानगा घेतोय....

आज दस-याच्‍या निमित्तानं तो पुन्‍हा आपणच मोठा असल्‍याचा आव आणत आदेश देणार की लहानग्‍याची भूमिका मान्‍य करत सूचना, विनवण्‍या करत स्‍वतःला अॅडजस्‍ट करणार, हे पाहावं लागेल.... पण या लहानग्‍याचा अलिकडच्‍या आठवडाभराचा तोरा पाहता तो आपणच मोठा असल्‍याचा आव आणत रयतेवर इंप्रेशन मारायचा प्रयत्‍न करणार आणि गेल्‍या कित्‍येक वर्षापासून लहान राहिलेल्‍या पण मोदी लाटेत अकाली प्रौढत्‍व लाभल्‍यानं मोठंपण आलेल्‍याला सुनावणार, असंच वाटतंय...