251 टन ऊस तोडून बैलगाडीने नेणारी अयोध्या

प्रकाश बोकील
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

जिल्हा लातूर. तालुका चाकूर. तिथल्या अजनसोंडा (खुर्द) नावाच्या एका गावातल्या एका झोपडीपुढं काही पत्रकार जमले होते. अयोध्या घरी कधी येतेय याची ते वाट पाहत होते. ते तिची मुलाखत घेणार होते.

जिल्हा लातूर. तालुका चाकूर. तिथल्या अजनसोंडा (खुर्द) नावाच्या एका गावातल्या एका झोपडीपुढं काही पत्रकार जमले होते. अयोध्या घरी कधी येतेय याची ते वाट पाहत होते. ते तिची मुलाखत घेणार होते.

खरंतर अयोध्या दहावी नापास मुलगी. वडील काशिनाथ खांडेकर. आई गयाबाई. दोघंही ऊसतोडणी कामगार. प्रचंड गरिबी. पदरात सात मुली. त्यातली अयोध्या पाचवी मुलगी. आठवीपासूनच अयोध्या आईबरोबर ऊसतोडणीच्या कामाला जाऊ लागली. मात्र दहावीत ती नापास झाली. मग वडिलांसोबत तीसुद्धा उसाची गाडी ओढायला लागली. पहाटे उठायचं, अकरा वाजेपर्यंत रानात दोन-अडीच टन ऊस तोडायचा, दुपारपर्यंत गाडीत भरायचा, पंधरा-वीस किलोमीटर दूर पन्नगेश्‍वरच्या साखर कारखान्यावर गाडी घेऊन जायचं.

दिवस मावळताना घरी परत यायचं. अक्षरश: रक्ताचं पाणी करत होती अयोध्या. बहिणींच्या लग्नाची कर्जं फेडायला तिनं हातात कोयता अन्‌ कासरा घेतला होता. त्या वर्षीच्या हंगामात तिनं एकटीनं 251 टन ऊस तोडून बैलगाडीतून कारखान्यापर्यंत पोचवला होता. म्हणूनच तर आज तिची मुलाखत घ्यायला वाकडी वाट करून पत्रकार अजनसोंड्याला आले होते.

दिवस मावळला अन्‌ अयोध्या घरी आली. पत्रकारांनी तिला घेरलं. प्रश्‍नांची सरबत्ती. ती गोंधळली. हे सगळं तिला नवीन होतं. पण लवकरच ती सरावली. पत्रकारांच्या प्रश्‍नांना छान उत्तरं दिली तिनं. एका प्रश्‍नाला उत्तर देताना ती म्हणाली, "मला आता या कष्टाची सवय झालीये.'' एका पत्रकारानं विचारलं, "अयोध्या महाराष्ट्रातल्या तुझ्यासारख्या मुलींना तू काय सांगशील?''
ती म्हणाली, "म्या काय सांगणार? मला एकच ठावं हाय, रडत बसायचं नाय; राबायचं!''
मुलांनो, "श्रमप्रतिष्ठा' म्हणजे नेमकं काय असतं हे पाहायला अजनसोंड्याला जायला हवं नाही?

Web Title: ayodhya cuts 251 ton sugarcane