शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यातच 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर निवासात उभारण्याबाबतच्या विधेयकाला गुरुवारी विधान परिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ही जागा एक रुपया नाममात्र भाडे तत्त्वावर देण्यास विरोधकांनी सरकारला भाग पाडले. 

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर निवासात उभारण्याबाबतच्या विधेयकाला गुरुवारी विधान परिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ही जागा एक रुपया नाममात्र भाडे तत्त्वावर देण्यास विरोधकांनी सरकारला भाग पाडले. 

महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यासाठी स्मारकाची जागा न्यासाला हस्तांतरित करण्यासाठी महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याबाबतचे विधेयक आज विधान परिषदेत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मांडले. या वेळी राहुल नार्वेकर आणि शरद रणपिसे यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी शिवसेनेचे मंत्री रवींद्र वायकर, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत आणि सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब आणि रवींद्र फाटक यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेमध्ये येऊन जोरदार विरोध केला. या विधेयकात भाडे ठरवण्याच्या मुद्द्यातून स्मारकाला वगळण्यात आले असल्याचा मुद्दा परब यांनी मांडला, तर या पद्धतीने कायद्याच्या आधारे बोलून या विषयाचा अवमान करू नये, असा मुद्दा भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मांडला. तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला आमचा संपूर्ण पाठिबा असल्याचे या वेळी रणपिसे, सुनील तटकरे यांनी सांगितले. या वेळी ही जागा एक रुपया भाडेतत्त्वावर देण्याची सुधारणा शरद रणपिसे यांनी सुचवली, त्यांच्या मागणीला विरोधकांनी पाठिंबा दिला. 

तांत्रिक मंजुरीसाठी पुन्हा विधानसभेत 
या विधेयकावर बोलताना कॉंग्रेसचे रणपिसे यांनी स्मारकाला ही जागा एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याबाबतची सुधारणा मांडली. स्मारकाबाबत जानेवारीला जशी अधिसूचना जारी केली आहे, त्याच आधारे हे विधेयक तयार करण्यात आले आहे. यात भाडे ठरवण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात आले असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी म्हटले. या वेळी तटकरे यांनी राज्य सरकारला पूर्ण अधिकार असल्याचे सांगून नवीन कायद्यात भाडेपट्ट्याचा आताच समावेश करा, अशी मागणी तटकरे यांनी केली. तरीही रणपिसे यांनी सुधारणा मागे न घेतल्यामुळे या सुधारणेचा राज्य सरकारने विचार करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. त्यानंतर या सुधारणेसह हे विधेयक परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. सुधारणेसह विधेयक आता विधानसभेत मांडण्यात येणार असून, तिथे तांत्रिक मंजुरी घेतली जाणार आहे. 

रावते यांनी मानले आभार 
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला जागा हस्तांतरणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्याबद्दल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेना आणि शिवसैनिकांच्या व ठाकरे कुटुंबीयांच्यावतीने सदस्यांचे आभार मानले. महापौर निवासाची जागा स्मारकाला देण्याची घोषणा सर्वप्रथम ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. जागा निवडण्यासाठी त्यांनी केलेली सूचना मौल्यवान असल्याचे सांगून रावते यांनी सर्वांचे आभार मानले.