अवैध रिक्षा व प्रवासी वाहनांना बंदी - नांगरे-पाटील

nangare-patil
nangare-patil

कऱ्हाड - वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कऱ्हाडमध्ये येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व रिक्षांचा सर्व्हे करून त्यांच्यावर कारवाई करा. अवैध वाहनांना शहरात येण्यास बंदी घाला, असा आदेश कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी दिला. शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही बसवून सिग्नल तोडणाऱ्यांच्या घरी दंडाच्या पावत्या पाठवा, अशीही सूचना त्यांनी केली. 

कऱ्हाडमध्ये आज झालेल्या नागरिकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पोलिस ठाण्याच्या विविध समित्यांचे सदस्य, विद्यार्थी, गुन्हे नियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते. रिक्षा संघटनेच्या वतीने अशोकराव पाटील यांनी प्रश्न मांडले. ते म्हणाले, ""शहरात अनधिकृत रिक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यात. गेटवरही लागणाऱ्या रिक्षांची संख्या जास्त आहे. शासनाचा कर भरून, परमिट घेवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालक-मालकांवर अन्याय होत आहे. अशा अवैध रिक्षांवर कारवाई करून प्रश्न मार्गी लावावा, यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, कारवाई होत नाही. रत्नाकर शानभाग, अनिकेत मोरे व अन्य नागरिक, महिलांनीही वाहतुकीसंदर्भात प्रश्न मांडले. त्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व अवैध रिक्षांचा सर्व्हे करण्याची सूचना केली. बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, अशा वाहनांना शहरात येण्यास पायबंद घाला, गेटवर किती रिक्षा लागतात, याचाही सर्व्हे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने मुख्य वितरकावर कारवाई करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. अवैध विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्यांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठवा, असेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालय परिसरातील वाहतुकीच्या प्रश्नावर डॉ. सोळंकी व अनिकेत मोरे यांनी मते मांडली. त्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी कॉलेज रस्त्यावर हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश दिला. 

पोलिसांना 500 रुपयांचे बक्षीस 
शहरातील वडार नाक्‍यावर टपरी होती. तेथे काही तरुण उभे राहून तरुणींना त्रास देत होते. तेथील नागरिकांनाही त्याचा त्रास होत होता. यासंबंधी महिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, हवालदार सौ. देशपांडे यांनी ही टपरी हटवली. त्याबद्दल तेथील नागरिकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्याची दखल घेवून श्री. नांगरे-पाटील यांनीही त्यांना 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 

पोलिस महानिरीक्षकांच्या सूचना 
* सिग्नलवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा 
* वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा 
* सिग्नल तोडणाऱ्यांच्या घरी दंडाच्या पावत्या पाठवा 
* महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या 
* अवैध पान टपऱ्यांचा सर्व्हे करून कारवाई करा 
* महाविद्यालय परिसरातील वाहतुकीला शिस्त लावा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com