बांगलादेशींना "स्थानिक' आधार!

बांगलादेशींना "स्थानिक' आधार!

मुंबई -  घुसखोर बांगलादेशींना शहरात राहण्यासाठी स्थानिक नागरिकांचाच आधार मिळत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या "सॅप प्रणाली'तील जन्म नोंदणीत फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या प्रकरणी "सॅप प्रणाली'च्या अधिकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाई वेग घेण्याची शक्‍यता आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या "आय' शाखेने मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर अधिक जोमाने कारवाई सुरू केली. आय शाखेचे अधिकारी बांगलादेशींवर नजर ठेवून असतात. ऑगस्टमध्ये आय शाखेने गोवंडी शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या सात बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कागदपत्रे जप्त केली. कागदपत्रांबाबत पोलिसांना संशय आला. सॅप प्रणालीत एका ठिकाणी बांगलादेशी नागरिकाचे नाव असल्याचे समोर आले. त्याला सॅप प्रणालीत नाव अपलोड करण्यासाठी पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या प्रकरणी आय शाखेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. संबंधित बांगलादेशी नागरिकाला कोणी मदत केली, कोणी किती पैसे घेतले आदींचा तपास आता शिवाजीनगर पोलिस करणार आहेत.

घुसखोरीपूर्वी मिळते प्रशिक्षण
बांगलादेशातील गरिबी पाहता तेथील नागरिक नदी-नाल्यांमार्गे कोलकात्यात येतात. तिथे पाच-सहा दिवस राहतात. दलालांकडून बंगाली भाषा बोलण्याचे प्रशिक्षण घेतात. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडले तर कसे बोलायचे, याचे खास धडेही बांगलादेशींना दिले जातात. पश्‍चिम बंगालमधील चार ग्रामपंचायतींमधून बांगलादेशींना निवासाचे बोगस प्रमाणपत्र दिले जाते. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर बांगलादेशी निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका आणि आधारकार्ड बनवतात. त्या कागदपत्रांच्या आधारे पारपत्रासाठी अर्ज करतात. पारपत्र मिळाल्यावर ते बांगलादेशी परदेशात नोकरीसाठी जातात. पारपत्रावर येणारे बांगलादेशी नागरिक महानगर प्राधिकरण (एमएमआर रिजन) मध्ये राहणाऱ्या बांगलादेशींकडे काही दिवस राहतात. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण असते.

बनावट जन्मदाखले
बांगलादेशी मुंबईत आल्यावर ते प्रथम जन्मदाखला काढण्यावर भर देतात. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरतात. जन्म नोंदणी रजिस्टरमध्ये वेगळे नाव आणि संकेतस्थळ व सॅप प्रणालीमध्ये दुसरे नाव नोंदवतात. त्यामुळे सॅप प्रणालीत गैरव्यवहार होत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत. जन्मदाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी आझाद मैदान, डोंगरी, शिवाजीनगर, ट्रॉम्बे, नवी मुंबईतील रबाळे, कोपरखैरणे, मंडणगड आदी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

ठेकेदारांना मिळतात स्वस्तात मजूर
बांगलादेशी एमएमआर (मुंबई, ठाणे आणि पनवेल) रिजनमध्ये कामाच्या शोधात येतात. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी स्वस्त मजूर म्हणून बांगलादेशी नागरिकांना ठेकेदार कामाला ठेवतात. ठेकेदारच त्यांची झोपडपट्टीत राहण्याची सोय करतात. हॉटेल, बार आणि वेश्‍याव्यवसायामध्येही बांगलादेशी नागरिक कामास आहेत.

दीड हजार आधार कार्ड जप्त
बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आधार कार्ड बनवतात. आय शाखेने आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांकडून दीड हजार बनावट आधार कार्ड जप्त केली आहेत. आधार कार्डबाबत स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिस संबंधित यंत्रणांकडे तपासासाठी कागदपत्रांची मागणी करतात; मात्र पोलिसांना ती दिली जात नसल्याचे चित्र आहे. त्यांना कागदपत्रे मिळवून देण्यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांचाही हात असल्याचे उघड झाले आहे.

टार्गेट मराठी शाळा
पोलिसांना चकवा देण्यासाठी आता बांगलादेशींनी नवीन युक्ती शोधून काढली आहे. ते आपल्या मुलांना हिंदीऐवजी मराठी शाळांमध्ये पाठवत असल्याची माहिती तपासात समोर आली. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांची चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

झोपडपट्ट्या आणि खाडीकिनारी वास्तव्य
मानखुर्द, गोंवडी, देवनार, डोंगरी, पायधुनी, भायखळा, काळबादेवी, चिराबाजार, शिवाजीनगर, ट्रॉम्बे, अँटॉप हिल, मालवणी, दहिसर, मिरा रोड, नालासोपारा, पालघर, रबाळे, कोपरखैरणे आदी ठिकाणी पोलिसांनी छापे मारून बांगलादेशींना गजाआड केले आहे. झोपडपट्ट्या आणि खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करतात. पोलिसांना चकवा देण्यासाठी ते घराच्या छतावर झोपतात. पोलिस आले तर तेथे कोणी राहत नाही असे त्यांना भासवायचे असते.

307 जणांना केले हद्दपार
2015 मध्ये मुंबई पोलिसांनी एक हजार 37 बांगलादेशींवर कारवाई केली होती. यंदाच्या वर्षी अकराशे जणांवर कारवाई केली आहे. त्यापैकी 307 बांगलादेशींची घरवापसी करण्यात पोलिसांना यश आले आहे. शंभरहून अधिक जण विविध तुरुंगात असल्याची गृह विभागाकडे नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com