एसटी कामगारांचे पवारांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बारामती - तीन दिवसांनंतरही संप मिटत नसल्याने व सरकार मागण्यांबाबत काहीच लक्ष देत नसल्याने काल एसटी कामगारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून साकडे घातले. पवार यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे व मध्यस्थी करण्याचे आश्‍वासन दिले.

राज्यातील एसटी कामगारांचा सातवा वेतन आयोग मिळावा व इतर मागण्यांसाठी संप सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून हा संप सुरू असून, राज्यात प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र, राज्यातील सरकार या मागण्यांकडे कोणतेही लक्ष देत नसून, एकीकडे संप सुरू व दुसरीकडे प्रवाशी वेठीला असे चित्र आहे. अशा स्थितीत हा संप मिटावा, वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी एसटी कामगारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीच्या विमानतळावर कामगारांच्या शिष्टमंडळाने  पवार यांची भेट घेत संपात मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यावर एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व संप मिटण्यासाठी मध्यस्थी करू, असे आश्‍वासन पवार यांनी दिल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले. 

दरम्यान, गुरुवारी दुपारी कामगारांनी संपादरम्यान मृत्यू झालेले नगर जिल्ह्यातील अकोले येथील एसटी कामगार एकनाथ वाकचौरे यांना श्रद्धांजली वाहिली व संपातील आपला सहभाग कायम ठेवला. बारामती शहरातील एसटी आगार, एमआयडीसी विभागीय कार्यशाळा आणि एमआयडीसी आगारातील कर्मचारी यामध्ये सहभागी होते.