सौंदत्ती रेणुका मंदिर विकासासाठी 137 कोटी - रामनगौडा तिपराशी

सौंदत्ती रेणुका मंदिर विकासासाठी 137 कोटी - रामनगौडा तिपराशी

बेळगाव - सौंदत्ती रेणुका मंदिर (यल्लम्मा) विकासासाठी 137 कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. मंदिर परिसरात मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार असून, शासनाने या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनगौडा तिपराशी यांनी मंगळवारी (ता. 21) माहिती आणि प्रसारण खात्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""धर्मादाय खात्याच्या यादीनुसार मंदिराला "अ' श्रेणी प्राप्त आहे. येथे कर्नाटकासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गोव्यासह देशाच्या इतर भागातूनही भक्त दर्शनासाठी येतात. रोज 15 ते 20 हजार भाविक मंदिराला भेट देत असून, डिसेंबर ते जानेवारीदरम्यान येणाऱ्या पौर्णिमेला सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. याठिकाणी भक्‍त किमान तीन दिवस राहून देवीची पूजा व नैवेद्य अर्पण करतात. यात्रा कालावधीत सुमारे 60 ते 70 लाख भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात मूलभूत सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.'' 

रेणुका मंदिराला सात किमीवर असणाऱ्या मलप्रभा नदीतून पाणी मिळते, मात्र भक्‍तांची वाढती संख्या पाहून याठिकाणी पाणीपुरवठ्याची आणखी एक स्वतंत्र योजना हाती घेतली आहे. 1997 मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने बंगळूरच्या आर्किटेक्‍ट यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला असून, त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. पाणी योजना राबवण्यासाठी 31 कोटी 50 लाख, विविध ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी 5 कोटी 96 लाख, पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी 74 लाख, मंदिराच्या पूर्वेला रिंगरोड बनविण्यासाठी 18 कोटी, बायपास रस्ता करण्यासाठी 15 कोटी, हंचिनाळ-सौंदत्ती रस्त्यासाठी 16 कोटी 78 लाख, ड्रेनेज व्यवस्था 18 कोटी 50 लाख, पार्किंग व्यवस्थेसाठी 5 कोटी 78 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

विविध ठिकाणी निवास व्यवस्थेसाठी इमारतीही उभारल्या जाणार असल्याची माहिती श्री. रामनगौडा यांनी दिली. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सी. कोटारगस्ती, समितीचे संचालक एम. आय. पुरदगुडी, एस. आर. पाटील, एस. व्ही. बळ्ळारी, एच. व्ही. उळ्ळागड्डी, सोमशेखर नायक आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com