सीमाप्रश्‍नावर साठे साहित्य संमेलनात ऊहापोह; ठरावात स्थान नाही

सीमाप्रश्‍नावर साठे साहित्य संमेलनात ऊहापोह; ठरावात स्थान नाही

बेळगाव - ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली’ असे सांगत सीमावासीयांच्या व्यथा आणि वेदना मांडणाऱ्या कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाला बेळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, ज्या अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली, त्यांच्याच नावाने झालेल्या या संमेलनात सीमाप्रश्‍न सोडवणुकीबाबतचा ठराव काही मांडला गेला नाही. हा अपवाद वगळता संमेलन यशस्वी ठरले. 

कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात एकूण पाच ठराव मांडण्यात आले. सर्व ठरावांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले. संमेलनात ‘माझी मैना गावावर राहिली : एक चिकित्सा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णा भाऊंनी सीमावासीयांच्या वेदनेला आपल्या छक्कडमधून वाचा फोडली, अशी माहिती वक्‍त्यांनी दिली. बेळगाव, कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, अशी अण्णा भाऊंची इच्छा होती. ती त्यांनी आपल्या छक्कडमधून दिसून येते. त्यामुळे, संमेलनाच्या सांगतेवेळी सीमाप्रश्‍न सोडवणुकीचा ठराव मांडला जाईल. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, ठराव मांडताना सीमाप्रश्‍नाला बगल देण्यात आल्याचे दिसून आले.

त्यानंतर अनेकांनी सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडणे आवश्‍यक होते असे मत व्यक्त करीत नाराजी प्रकट केली. ठराव मांडणे राहून गेले की वाद टाळण्यासाठी ठरावाला वगळण्यात आले, याबाबत काही समजू शकले नाही. पण, संमेलनस्थळी याचीच चर्चा होती.

कॉ. साठे हे फक्‍त साहित्यिक नव्हते तर चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या साहित्यातून गोरगरीब, दीनदलित आणि जाती व्यवस्थेत अडकलेल्या समाजाला उभे राहण्याचे बळ मिळाले, यावर अनेकांनी प्रकाश टाकला. त्यामुळे, साठेंचे कार्य समजून घेता आले. असे मत अनेकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात पाच ठराव संमत केले. ते असे

  •  गौरी लंकेश, डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

  •  देशभर मूलतत्त्ववाद्यांचा गोंधळ सुरू आहे. अशा मूलतत्त्ववाद्यांवर सरकारने तत्काळ बंदी आणावी.

  •  देशातील उजव्या शक्‍तींनी सुरू केलेले इतिहासाचे पुनर्लेखन आणि विकृतीकरण तातडीने थांबवावे

  •  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी शाळा, मराठी ग्रंथालये व साहित्य संमेलनाला देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, सीमाभागातील संस्थांना महाराष्ट्र सरकारने भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी भरीव अनुदान द्यावे

  •  साहित्य, कला, संस्कृती, प्रसारमाध्यमे, नाटक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यात येत असून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य सुरक्षित राहावे.

कॉ. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचे प्रकाशन
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर कॉ. गोविंद पानसरे यांचे समग्र वाङ्‌मय खंड दुसरा या पुस्तकाचे प्रा. तानाजी ठोमरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी उमा पानसरे, प्रा. आनंद मेणसे, प्रसाद कुलकर्णी, मुक्‍ता मनोहर, माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com