बेळगाव महापालिकेची आता कन्नड फलक सक्‍ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

बेळगाव - शहरातील व्यापारी व उद्योजकांना व्यापार परवाना व कन्नड फलक सक्तीचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत परवाना न घेणारे किंवा कन्नड फलक न लावणाऱ्यांची आस्थापने बंद केली जाणार आहेत.

बेळगाव - शहरातील व्यापारी व उद्योजकांना व्यापार परवाना व कन्नड फलक सक्तीचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत परवाना न घेणारे किंवा कन्नड फलक न लावणाऱ्यांची आस्थापने बंद केली जाणार आहेत. याबाबत सोमवारपासून (ता. २२) शहरात जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे; तर ३१ जानेवारीपर्यंत परवान्याची मुदत असलेल्या व्यापारी व उद्योजकांना परवाना नूतनीकरणासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नूतनीकरण न घेतल्यास ५० टक्के दंड आकारला जाणार आहे.

व्यापार परवाने देण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मते शहरातील ७ हजाराहून अधिक व्यापारी व औद्योगिक आस्थापनांकडे परवाने नाहीत. कायद्यातील तरतुदीनुसार परवाना घेतल्याशिवाय कोणताही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करता येत नाही किंवा चालविता येत नाही. पण परवाने घेण्यासह त्याचे दरवर्षी नूतनीकरण करण्याकडे शहरातील व्यापारी व उद्योजकांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाला जाग आली आहे. आधी जागृती मोहीम राबवून मग व्यापार परवाना सक्ती केली जाणार आहे. परवाने न घेणाऱ्यांवर थेट कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची सूचना आरोग्याधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकांना दिली आहे. 

जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी घेतलेल्या बैठकीत कन्नडसक्तीचा निर्णय झाला आहे. शहरातील सर्व आस्थापनांवरील फलक कन्नड भाषेतच हवेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कन्नडसक्तीची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे, आता व्यापार परवाना व कन्नड सक्ती एकाचवेळी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. व्यापार परवाना तपासणीवेळी फलकांचीही तपासणी केली जाणार आहे. 

जागृतीसाठी मराठीचा वापर
शहरातील व्यापारी व औद्योगिक आस्थापनांचे फलक मराठी, कन्नड व इंग्रजी या तीन भाषेत आहेत. बेळगावात येणाऱ्या परराज्यातील लोकांना आस्थापनांची माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश आहे. पण प्रशासनाला आस्थापनांचे फलक कन्नड भाषेतच हवे आहेत. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. परवाना सक्तीची माहिती व्यापारी व उद्योजकांना मिळावी यासाठी मराठी भाषेतून आवाहन करण्यात येत आहे. पण आस्थापनांच्या फलकावर कन्नडच हवे, असा प्रशासनाचा अट्टहास आहे.

Web Title: Belgaum News compulsion of Kannada Board issue