बेळगावात दगडफेक; तणाव

बेळगावात दगडफेक; तणाव

बेळगाव - घी गल्लीतून खडक गल्लीत व खडक गल्लीतून घी गल्लीत बाटल्या, विटा, फरशांचे तुकडे व दगडफेकीचा प्रकार बुधवारी (ता. १५) रात्री दहाच्या सुमारास घडला. गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने खडक गल्लीतील महिला व तरुणी आक्रमक झाल्या. दगड येत असलेल्या गल्लीत घुसून समाजकंटकांना पकडा, असे म्हणत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. उलट पोलिसांनी लाठीमार करत सर्वांना हुसकावून लावले. 

पोलिसांच्या तीन दुचाकी जाळण्यात आल्या. पोलिस व्हॅनवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलिस आयुक्तांच्या कपाळाला लागल्याने ते जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिस कुमक अधिक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. 

दरवेळी दगड व बाटल्या कुठून येतात याचा एकदा सोक्षमोक्ष लावाच, अशी मागणी खडक गल्लीतील रहिवाशांनी केली. परंतु पोलिस सर्वांनाच हुसकावून लावत होते. रात्री १०.३०च्या सुमारास पाहणीसाठी आलेले पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभटही दगडफेकीत जखमी झाले. दरबार गल्ली व भडकल गल्लीतही किरकोळ दगडफेक झाली. त्यातून पोलिसांची मोटारही सुटली नाही. काही ठिकाणी टायरही जाळण्यात आले.
रात्री लोक जेवण करून बाहेर थांबलेले असताना एक महिला आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन घरासमोर थांबली होती. यावेळी घी गल्लीतून बाटली या महिलेच्या बाजूला पडली. महिला घाबरून आत गेली. त्यानंतर बाटल्या, विटा, फरशांचे तुकडे व दगड येण्यास प्रारंभ झाला. ते मागच्या गल्लीतून येत असल्याचे रहिवाशांना समजले. त्यानंतर खडक गल्लीतूनही प्रत्युत्तरादाखल दगडफेकीला प्रारंभ झाला. शाळा क्रमांक सहा ते आपटेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर अधिक दगडफेक सुरू होती. घटनेची माहिती मिळताच खडेबाजारचे पोलिस निरीक्षक त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जलदकृती दलाचे पथक, तीन पोलिस बसेस, सहा पोलिस जीपसह मोठा ताफा येथे आला.

खडक गल्लीतील महिला रस्त्यावर
पोलिसांचा ताफा आल्यानंतर खडक गल्लीतील महिला बाहेर आल्या. त्यांनी पोलिसांना नेमके दगड कुठून येत आहेत, याची कल्पना दिली. तिथे जाऊन समाजकंटकांना ताब्यात घ्या, अशी त्यांची मागणी होती. परंतु पोलिसांनी त्याकडे लक्ष न देता या महिलांना व तरुणांना हाकलून देण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येक वेळी दुसऱ्या गल्लीतून दगडफेक होणार आणि नाव खडक गल्लीचे, असाच प्रकार घडतो. याचा सोक्षमोक्ष लावून समाजकंटकांना ताब्यात घ्या, अशी मागणी लावून धरली. नेहमी दहशतीत जगण्यापेक्षा आम्ही या गल्लीत घुसतो, म्हणून काही महिला घी गल्लीकडे जाऊ लागल्या. परंतु पोलिसांनी त्यांना अडवत लाठीमाराला सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com