छगन भुजबळ आज शिवसेनेत असते तर !

छगन भुजबळ आज शिवसेनेत असते तर !
छगन भुजबळ आज शिवसेनेत असते तर !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कवचकुंडले म्हणून ज्येष्ठ नेते दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक आणि छगन भुजबळ यांची ओळख होती. एककाळ असा होता की या सर्वच नेत्यांनी सभा-संमेलने गाजवली. त्यापैकी भुजबळ हे असे नेते होते की बाळासाहेबांनंतर त्यांचे भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक शिवाजीपार्क दणाणून सोडत असतं. त्यांचे भाषण म्हणजे उस्फूर्त आणि आग ओकणारे असे. तसेच भल्याभल्यांचा ते दात ओठ खात अतिशय आक्रमक शैलीत समाचार घेत असत. शिवसेनेची खऱ्या अर्थाने मुलूखमैदानी तोफ होती ती. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ज्या शरद पवार आणि कॉंग्रेसशी लढण्यात त्यांची हयात गेली त्याच कॉंग्रेसच्या वळचणीला ते गेले. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ ते मंत्री होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांना पुढे आणण्यात आले. काही प्रमाणात पक्षाला फायदा झाला. मात्र भुजबळ मनाने जसे शिवसेनेत रमले तसे कॉंग्रेस किंवा "राष्ट्रवादी‘त रमले नाहीत. जर शिवसेनेत असते तर ते जोशीनंतर मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र या जर तरला काही अर्थ नसतो. ज्या माणसाचे भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असे तो बुलंद आवाजच आज तुरुंगात बंदिस्त झाला आहे.

मंत्रिपदावर असताना केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना तुरुंगात जावे लागले. आज त्यांच्या सुटकेसाठी मोर्चे निघत आहे. पण, तेच भुजबळ दुसऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे काढत असत आणि सरकारला धारेवर धरत असत. त्यांनी एक काळ खूप गाजवला. भुजबळ नावाचं घोंघावणारं वादळ कोणीच शमविणार नाही असे छातीठोकपणे शिवसैनिक सांगत असतं. मात्र शिवसेनेतही जातीपातीचे राजकारण सुरू असल्याची टीका करीत ते बाहेर पडले.

"राष्ट्रवादी‘त असताना त्यांनी ओबीसीची व्होट बॅंक बांधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले. पुढे मुंडे यांचेही अपघाती निधन झाले आणि ते एकटे पडले. असे म्हणतात की आज जर मुंडे असते तर भुजबळांच्या केसालाही धक्का लागला नसता. मुंडे-भुजबळांनी ओबीसीच्या माध्यमातून स्वपक्षात दबावाचे राजकारण केले. त्याच राजकारणाची किंमत आज पंकजा मुंडे आणि भुजबळांना मोजावी लागत आहे अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. ओबीसी राजकारणाचाच एक भाग म्हणूनच पंकजा यांनी भुजबळांची भेट घेतली. पुढे "राष्ट्रवादी‘चे नेतेही धावतपळत त्यांच्या भेटीला गेले. नाशिकच्या मोर्चात तर धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड हे नेते सहभागी झाले. मोर्चा काढल्याने भुजबळ सुटतील की नाही याचे उत्तर आताच देता येत नाही. शेवटी त्यांची सुटका ही सरकारच्या हातात आहे.

भुजबळ वादळ होते हे सांगण्या मागचे कारणही असे आहे, की त्यांनी शिवसेनेत असताना अनेक वादही ओढवून घेतले. गांधीजींचे पुतळे उखडून टाका आणि नथुरामाचे पुतळे उभारा असे म्हणणारे भुजबळच होते. रिडल्स इन रामायण प्रकरणी शिवसेना विरोधी दलितांचे मोर्चेही मुंबईत निघाले होते. त्यावेळी मुंबईतील हुतात्मा स्मारकावर दलित गेले म्हणून या स्मारकावर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करणारे भुजबळ होते. सगळेच राजकारणी जसे रंग बदलतात तसे भुजबळांनी ते बदलले आणि आपला दबदबा कायम ठेवला. मुद्रांक गैरव्यवहाराच्या आरोपातूनही ते सुटले पण महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात अडकले. एक मात्र खरे की, शिवसेनेत असताना बाळासाहेबांची त्यांना खंबीर साथ मिळाली म्हणून ते इतके मोठे झाले. भुजबळांनी शिवसेनेचा जेव्हा त्याग केला तेव्हा ते म्हणाले होते की मला सर्वांत दु:ख होत आहे. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होती, की मग आम्ही काय दिवाळी साजरी करतो. बाळासाहेबांना वाटत होते की एक दिवस शिवसेनेची सत्ता येईल शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी भुजबळ शिवसेनेबाहेर होते. ज्या वेळी जोशींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळी संपूर्ण शिवसेनेत एकच चर्चा होती. आज भुजबळ शिवसेनेत असते तर...!
त्यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चानंतरही अनेकांना हाच प्रश्‍न पडला असेल का ? भुजबळ आज शिवसेनेत असते तर... ?
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com