राज्यात कोट्यवधींची रोकड जप्त

राज्यात कोट्यवधींची रोकड जप्त

पुणे - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात सर्वत्र उमटू लागले आहेत. विदर्भात व  मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दोन दिवसात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

विदर्भात आज अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ४ कोटी २८ लाख रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 

अमरावती शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री दीडच्या सुमारास एका ट्रॅक्‍समधून दोन पोती भरून असलेली ३ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम जप्त केली. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये जमा झालेली ही रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच परतवाडा येथे एका व्यापाऱ्याकडे ७८ हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या एका घटनेत ९ लाख ९४ हजारांची रोकड वाहनातून जप्त करण्यात आली. देवरी (जि. गोंदिया) येथे राज्य सीमेवर नाकाबंदीदरम्यान एका वाहनातून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. गडचिरोलीत जिमलगट्टा पोलिसांनी १४ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या संतोष चिंतावार याला ताब्यात घेतले. दारव्हा (जि. यवतमाळ) येथे एका कारमध्ये सहा लाख ७३ हजारांची रोकड सापडली. याच जिल्ह्यातील घाटंजी येथेही अडीच लाख पोलिसांनी जप्त केले.

उस्मानाबादेत मोटारीत ८६ लाख

उस्मानाबाद - निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयासमोर बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास केलेल्या कारवाईत एका आलिशान गाडीतील ८६ लाखांची रोकड ताब्यात घेतली. या रोकडमध्ये एक हजाराच्या नोटांचा समावेश होता. वाहनातील आदित्य वीरेंद्र सिंग, ऋषिकेश चौधरी, ज्ञानोबा केजकर आदींकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न मिळाल्याने पथकाने ही रक्काम ताब्यात घेतली आहे. पथकप्रमुख एस. एम. चपलवार आणि त्यांच्या साथीदारांनी ही कारवाई केली. रक्कम कोणाची, कुठे नेली जात होती, याबाबत तपासानंतरच माहिती मिळेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

२२ लाख केले परत

निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाने मंगळवारी (ता.१५) सकाळी केलेल्या तपासणीत एका वाहनात २२ लाखांची रोकड आढळली होती. ती स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेची असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न झाल्याने पथकाने पुढील कारवाई थांबवली.

उमरग्यात ९१ लाख पकडले

उमरगा - निवडणूक विभागाच्या पथकाने आज दुपारी येथे जीपची तपासणी केली असता ९१ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळली. ही रक्‍कम लोकमंगल बॅंकेची असल्याचे सांगण्यात आले, मात्र योग्य कागदपत्रे नसल्याने पथकाने रक्‍कम व जीप पोलिसांच्या स्वाधीन केली. महामार्गावरील जकेकूर-चौरस्ता भागात पथकाने जीप अडवली. त्या वेळी जीपमधील लोकमंगल बॅंकेच्या कर्मचाऱ्याने जीपमध्ये साडेआठ लाखांची रक्कम असल्याचे सांगितले, मात्र तो कागदपत्र दाखवू शकला नाही. जीपच्या मागील बाजूच्या आसनाखाली एक हजार रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. मोजणी केली असता ही रक्कम ९१ लाख ५० हजार रुपये होती. पथकाने पोलिसांना माहिती दिली. लोकमंगल बॅंकेच्या तालुक्‍यातील विविध शाखांची ही रक्कम असून, उमरग्यातील शाखेतून ती सोलापूरच्या मुख्य शाखेत घेऊन जात होतो, असा दावा बॅंकेचे कर्मचारी तानाजी फाळके यांनी केला.

जिंतूरमध्ये दहा लाख ताब्यात

जिंतूर - निवडणूक पथकाने आज येथे केलेल्या कारवाईत वाहनातून दहा लाखांची रोकड बुधवारी ताब्यात घेतली. ही रक्कम सुंदरलालजी सावजी नागरी सहकारी बॅंकेच्या जिंतूर येथील शाखेतील असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले.

जिंतूर शहरातून एक चारचाकी वाहन पैसे घेऊन येलदरी मार्गे सेनगावकडे जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शेवडीपाटीजवळ सापळा लावला होता. त्या वेळी एक चारचाकी वाहन थांबवून चौकशी केली असता नव्याने चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आढळल्या. ही रोकड दहा लाखांची होती. वाहनातील विजय आडे व बबन खाडे यांची विचारपूस केली असता, रोकड जिंतूर येथील सुंदरलालजी सावजी नागरी सहकारी बॅंकेची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याजवळील कागदपत्रांवरूनही तशी खातरजमा झाली. पथकाने वरिष्ठांना ही माहिती दिली. ही रक्कम कोशागार कार्यालयात जमा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com