मुख्यमंत्र्यांचा डाव शिवसेनेला पेच 

BJP blinks, Mumbai's new Mayor will be from Shiv Sena
BJP blinks, Mumbai's new Mayor will be from Shiv Sena

मुंबई - मुंबईच्या महापौरपदाबरोबरच महापालिकेच्या कोणत्याही समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 4) जाहीर केला.

मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या या डावामुळे शिवसेनेसमोरचा पेच अधिकच क्‍लिष्ट होणार आहे. महापौरपदाचा मार्ग मोकळा होऊनही शिवसेनेसाठी ती वाटचाल खडतरच ठरण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या राजकीय पटावरच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या राजाला शह बसेल की राज्यातील सत्तेचा डावच उधळला जाईल, याविषयी अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. कारण, या कृष्णनीतीला शिवसेनेचे "उद्धव' जशास तसे उत्तर देतील, असेही शिवसेनेच्या "संजयां'कडून सांगितले जात असल्याचे कळते! 

महापौरपदाबाबत उत्सुकता ताणली गेली असताना मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी नाराज केले असले तरी पालिकेतील सत्ता-समीकरणासाठी ओढाताण करताना भाजपच्या पारदर्शक चेहऱ्याला तडा जाणार नाही, याची काळजी घेतली. भाजपने महापौरपदाची निवडणूक लढवली असती, तर शिवसेनेचा पराभव करण्यासाठी अन्य पक्षांतील नगरसेवकांना फोडावे लागले असते किंवा मनसेला सोबत घ्यावे लागले असते; मात्र हे दोन्ही निर्णय भाजपसाठी अडचणीचे होते. शिवसेनेशी युती केली असती, तर शहरातील समस्यांना भाजपलाही जबाबदार धरण्यात आले असते; परंतु आता भाजपला त्याची भीती राहणार नाही. सत्तेत नसल्यामुळे मुंबईतील समस्यांचे खापर थेट शिवसेनेवरच फोडता येईल; शिवाय पालिकेतील पै-पैचा हिशेब मागण्यासाठी भाजपचे नेते तयारच असतील. 

शिवसेनेला "सहकार्य' करण्याची भूमिका भाजपने घेतली असली तरी पारदर्शकतेचा आग्रह कायम ठेवला आहे. मुंबई पालिकेसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नियुक्त करण्यात येणार आहे. या सर्व भूमिकांमुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. उपलोकायुक्त नियुक्तीच्या घोषणेमुळे शिवसेनेच्या गोटात आताच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील प्राथमिक समस्यांनाही शिवसेनाच जबाबदार राहणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील सत्तेवर पाणी सोडल्याचे सांगण्यात येते. 

विधानसभेच्या मुंबईतील 36 जागा, राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी महत्त्वाच्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. 

भाजपची टांगती तलवार 
भाजप थेट विरोधात बसली असती, तर त्यांच्याविरोधात रणनीती आखणे शिवसेनेला सोपे होते; मात्र आता शिवसेनेच्या डोक्‍यावर भाजप ही टांगती तलवार राहणार आहे. सर्वच समित्यांवरील शिवसेना आणि भाजपच्या सदस्यसंख्येत एकाचा फरक आहे. त्यामुळे भाजपविरोधी पक्षांना सोबत घेऊन शिवसेनेचे महत्त्वाचे प्रस्ताव हाणून पाडू शकतो, ही भीती कायम राहणार आहे. भाजप आपली संपूर्ण ताकद पालिकेतील नवे गैरव्यवहार आणि घोटाळे बाहेर काढण्यासाठी वापरेल, अशीही शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com