पंकजाताईंचा मास्टरस्ट्रोक; बीडमध्ये सुरेश धस विजयी

सयाजी शेळके
मंगळवार, 12 जून 2018

भाजपने माजी मंत्री सुरेश धस यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कराड यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला, परंतु कराड यांनी अचानक माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे धस आणि जगदाळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस यांनी ७४ मतांनी विजय मिळविला. सुरेश धस यांना 526 मते मिळाली, तर, अशोक जगदाळे 452 यांना मते मिळाली. धस यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांना मोठा धक्का मानण्यात येत आहे.

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची मतमोजणी मंगळवारी (ता. १२) येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत पार पडली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. दहाच्या सुमारास धस यांनी ७४ मतांची निर्णायक आघाडी घेतल्याचे समजताच समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला. ही आघाडी तुटणे शक्य नसल्यामुळे धस यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. २१ मे रोजी मतदान घेण्यात आले होते. बीड येथील अपात्र नगरसेवकांच्या मतदानाच्या हक्कावरुन ही निवडणूक प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेली होती. बीडमधील ते दहा मतदान एकत्र करुन मोजणी करण्याचे आदेश सेामवारी (ता. ११) खंडपीठाने दिल्यानंतर मंगळवारी मतमोजणी झाली.

भाजपने माजी मंत्री सुरेश धस यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कराड यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला, परंतु कराड यांनी अचानक माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे धस आणि जगदाळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

या मतदारसंघातील एकूण १००५ पैकी १००४ मतदान झाले होते. मंगळवारी पाच टेबलवर मतमोजणी पार पडली. त्यामध्ये भाजपचे धस यांनी ७४ मतांची निर्णायक आघाडी घेतली असून, अधिकृत घोषणा अद्यापही झाली नव्हती. 

मतमोजणीदरम्यान, बाद मतावरून धस व जगदाळे यांच्या पावणेदहाच्या सुमारास मतमोजणी केंद्रातच शाब्दिक चकमक झाली. तीन ते चार मिनिटे ही शाब्दिक चकमक सुरू होती.

Web Title: BJP candidate Suresh Dhas win in Beed legislative council election