विठ्ठल नगरीत प्रथमच फुलले कमळ 

विठ्ठल नगरीत प्रथमच फुलले कमळ 

पंढरपूर - पंढरपूर पंचायत समिती निवडणुकीत परिचारक गटाचे परंतु भाजपच्या कमळ चिन्हावर विजयी झालेले दिनकर नाईकनवरे व अरुण घोलप यांची सभापती व उपसभापतिपदी वर्णी लागल्याने पंचायत समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. श्री. नाईकनवरे व श्री. घोलप यांची निवड करून परिचारकांनी अनेक वर्षांपासून परिचारक गटाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक व आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीने 16 पैकी 12 जागा जिंकून पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यामध्ये सात भाजप, चार पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी व एका शिवसेना उमेदवाराचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषदेच्या तब्बल पाच व पंचायत समितीच्या चार जागा यंदा परिचारक गटाने अधिक जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीत परिचारक गटाला पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घ्यावी लागली होती. परंतु, या वेळी परिचारक गटाने एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नाईकनवरे हे परिचारक गटाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. मागील वेळी याआधीच्या करकंब गटातील पटवर्धन कुरोली गणातून श्री. नाईकनवरे हे निवडून आले होते. त्यांनी मागील वेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे यांचा पराभव केला होता. या वेळी नव्याने झालेल्या पिराची कुरोली गणातून परिचारकांनी श्री. नाईकनवरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी या वेळी कल्याणराव काळे यांचे बंधू व विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे यांचा पराभव करून या भागातील परिचारक गटाचे वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे त्यांची सभापती म्हणून निवड होईल, असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे त्यांना संधी देण्यात आली आहे. 

उपसभापती अरुण घोलप हे देखील परिचारक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पांडुरंग कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून ते काम पाहात आहेत. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. लक्ष्मी टाकळी गणात भालके गटाचे मोहन देठे यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. त्यांना उपसभापतिपदाचा मान देण्यात आल्याने कोर्टी भागातील कार्यकर्त्यांचे बळ वाढणार आहे. सभापती व उपसभापती हे दोघेही भाजपच्या कमळ चिन्हावर विजयी झालेले असल्याने पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. 

आरोग्य, शिक्षण, कृषी आदी विभागांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारणा, प्रधानमंत्री घरकुल योजना तसेच वैयक्तिक लाभांच्या विविध प्रकारच्या शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानातील तालुक्‍याचे 82 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मात्र, पंतप्रधान घरकुल योजनेचे उद्दिष्ट 950 असताना आतापर्यंत 700 पर्यंतच घरकुले झाली आहेत. उद्दिष्ट पूर्ततेसाठी मार्चअखेर हे काम वेगाने पूर्ण करावे लागणार आहे. 

समन्वयाने कामाची अपेक्षा 
गेल्या काही वर्षांत अनेक कारणावरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याचे चित्र दिसले होते. त्यामुळे विकासकामांना खिळ बसून लाभार्थींपर्यंत योजना पोचवण्यात अडचणी आल्या होत्या. आगामी काळात नूतन सभापती व उपसभापतींनी प्रशासनाशी तसेच सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून अधिक उत्साहाने काम करणे अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com