परिचारकांचे निलंबन निश्चित; 'जय जवान जय किसान'चा नारा

महेश पांचाळ
बुधवार, 8 मार्च 2017

सभागृहात 'जय जवान जय किसान'च्या घोषणा दुमदुमल्या.

मुंबई : सैनिकांच्या पत्नीचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. 
'देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुबीयांच्या भावना दुखवणारा परिचारक सभागृहात नको,' अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षांनी घेतली.

यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. 
'सर्वपक्षीय समिती नेमून निर्णय घेऊ तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करू,' असे त्यांनी सांगितले. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावेळी विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकार परिचारक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभागृहात 'जय जवान जय किसान'च्या घोषणा दुमदुमल्या. त्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी समिती सात सदस्यांची समिती स्थापन केली जाईल. अधिवेशन संपण्याच्या आत समितीने अहवाल देईपर्यंत परिचारकांना निलंबित करण्याचा प्रस्ताव उद्या सभागृहासमोर ठेवला जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याबाबत सात सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे. अधिवेशन संपेपर्यंत समिती अहवाल देणार तोपर्यंत आमदार परिचारक हे निलंबित राहतील."

जवानांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांचा तीव्र निषेध करीत विरोधकांनी त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे.