दुसऱ्या टप्प्यातही भाजपचीच बाजी

दुसऱ्या टप्प्यातही भाजपचीच बाजी

सर्वाधिक पाच नगराध्यक्ष विजयी; नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीची आघाडी
मुंबई - राज्यातील नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही भारतीय जनता पक्षाने बाजी मारत पहिला क्रमांक टिकवला. पुणे जिल्ह्यातील दहा आणि लातूर जिल्ह्यातील चार अशा चौदा नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये भाजपने सर्वाधिक पाच नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला, तर एकूण 324 विजयी नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक 93 जागा जिंकून पहिल्या स्थानावर झेप घेतली.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात चौदा नगरपालिकांसाठी काल (बुधवारी) मतदान झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्ण वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपने दहापैकी तीन नगराध्यक्षपदे जिंकली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाच्या चिन्हावर केवळ बारामतीचे एकमेव नगराध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. लातूर जिल्ह्यातील चारपैकी दोन नगराध्यक्षपदे जिंकून भाजपने मराठवाड्यातही वर्चस्व सिद्ध केले.

भाजपला लोणावळा, तळेगाव-दाभाडे, आळंदी, उदगीर व निलंगा नगरपालिकेत नगराध्यक्षपद मिळाले आहे, तर, त्या पाठोपाठ कॉंग्रेसने इंदापूर, जेजुरी व सासवडच्या नगराध्यक्षपदी जनतेचा कौल मिळवला. राष्ट्रवादीला बारामती, औसा या नगरपालिकांत निर्विवाद यश मिळाले, तर दौंडमध्ये राष्ट्रवादीपुरस्कृत आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली. शिवसेनेला मात्र एकमेव जुन्नरमध्ये नगराध्यक्षपद लाभले. मात्र या पालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले.

नगरसेवकांच्या तुलनेत राष्ट्रवादीने सर्वाधिक 93 जागा जिंकल्या. तर भाजपला 81 जागा मिळाल्या. कॉग्रेसला मात्र या चौदा नगरपालिकांत फटका बसला असून, त्यांना केवळ 48 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे, तर शिवसेनेला 25, अपक्ष 26 आणि इतर पक्ष 36 व स्थानिक आघाड्यांचे 14 नगरसेवक विजयी झाले.

पुणे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांपैकी प्रत्येकी तीन ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एकच नगराध्यक्षपद मिळाले आहे. विविध आघाड्यांना दोन पदे मिळाली आहेत. या निकालाने भाजपच्या नगराध्यक्षांमध्ये दोनने, तर कॉंग्रेसच्या नगराध्यक्षांमध्ये एकने वाढ झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपद गमवावे लागले आहे.

बारामतीत मावळते नगराध्यक्ष योगेश जगताप, तर शिरूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे या चारही पक्षांच्या शहराध्यक्षांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, नगरसेवकपदांच्या एकूण जागांपैकी सर्वाधिक 84 जागा पटकावत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. यात पक्षाच्या अधिकृत चिन्हावरील 70, तर पक्षपुरस्कृत 14 नगरसेवकांचा समावेश आहे. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसपुरस्कृत तसेच भाजप आणि भाजपपुरस्कृत प्रत्येकी 41 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे 21 आणि विविध आघाड्यांचे 26 जण निवडून आले आहेत. याशिवाय अपक्षांसह अन्य 11 नगरसेवक निवडून आले आहेत.

पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली होती. तर 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले होते. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत कॉंग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. कॉंग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले, तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर होती. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर होती आणि त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 होती.

दिग्गजांना दणका
चौदा नगरपालिकांत दिग्गज नेत्यांना मात्र दणका बसला आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना फक्त नगराध्यक्षपदी कॉंग्रेसला यश मिळवून देता आले, तर पालिकेत मात्र राष्ट्रवादीने कॉंग्रेसला पिछाडीवर टाकले. सासवडमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना यश मिळवता आले नाही. स्थानिक विकास आघाडीने येथे शिवसेनेचा पुरता धुव्वा उडवला. दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल यांना माजी आमदार थोरात यांनी दणका दिला. येथे राष्ट्रवादीपुरस्कृत आघाडीने एकहाती सत्ता खेचून आणली.

पक्षनिहाय नगराध्यक्ष (एकूण जागा 14 : कंसात विजयी संख्या)
भाजप : लोणावळा, तळेगाव-दाभाडे, आळंदी, उदगीर व निलंगा (5)
राष्ट्रवादी कॉंग्रेस : बारामती, औसा (2)
कॉंग्रेस : इंदापूर, जेजुरी (2)
शिवसेना : जुन्नर (1)
स्थानिक विकास आघाडी (राष्ट्रवादीपुरस्कृत) : दौंड (1)
जनमत विकास आघाडी (कॉंग्रेसपुरस्कृत) : सासवड (1)
शिरूर विकास आघाडी : शिरूर (1)
बहुजन विकास आघाडी : अहमदपूर (1)

पक्षनिहाय विजयी उमेदवार (एकूण जागा : 324)
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 93
भाजप : 81
कॉंग्रेस : 45
शिवसेना : 23
एमआयएम : 06
इतर पक्ष : 36
अपक्ष : 26
स्थानिक आघाड्या : 14

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com