नगरपालिका निवडणुकांत भाजप अव्वल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

शिवसेनेलाही लाभ; राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का

शिवसेनेलाही लाभ; राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का
मुंबई - नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी विविध टप्प्यांत झालेल्या निवडणुकांच्या एकूण निकालांत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष राज्यात अव्वल ठरला आहे. सत्तेतील सहभागी शिवसेनेलाही अपेक्षित लाभ झाला असला, तरी भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या विरोधी पक्षांवर मात करीत क्रमांक एकची कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकीचा विचार करता, राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्‍का बसला आहे, तर कॉंग्रेसचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत तितकेसे नुकसान झाले नाही.

नगर परिषदेच्या अंतिम आणि तिसऱ्या टप्प्याचे निकाल आज हाती आले. यामध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांचा समावेश होता. तीन टप्प्यांत एकूण 199 नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात 164, दुसऱ्या टप्प्यात 14, तर तिसऱ्या टप्प्यात 21 नगरपरिषदांसाठी निवडणूक झाली होती. या तिन्हीही टप्प्यांत सत्ताधारी भाजपने जोरदार कामगिरी केली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार थेट निवडण्याच्या तरतुदीचा लाभ घेताना भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष जिंकून आणण्याचा पराक्रम केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती किल्ला लढवताना प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. अगदी शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी दौरे करीत परिश्रम घेतले होते.

पक्षीय बलाबल
- एकूण नगर परिषदा, नगरपंचायती निवडणूक - 199
- एकूण जागा - 4460
- भाजप - 1090, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 786, कॉंग्रेस - 894, शिवसेना - 598,
- नगराध्यक्ष - भाजप - 64, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 22, कॉंग्रेस - 32, शिवसेना -26

Web Title: bjp topper in municipal election