सत्ता केंद्र निलंगेकरांच्या वाड्याकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला व विलासराव देशमुखांच्या लोकप्रियतेचा गड मानल्या जाणाऱ्या लातूर महानगरपालिकेत भाजपने बहुमताची उडी घेत सत्ता काबीज केली. या निकालामुळे देशमुखांच्या "गढी'वरचे राजकीय केंद्र आता निलंगेकरांच्या वाड्यावर सरकल्याने कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे.

मुंबई - कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला व विलासराव देशमुखांच्या लोकप्रियतेचा गड मानल्या जाणाऱ्या लातूर महानगरपालिकेत भाजपने बहुमताची उडी घेत सत्ता काबीज केली. या निकालामुळे देशमुखांच्या "गढी'वरचे राजकीय केंद्र आता निलंगेकरांच्या वाड्यावर सरकल्याने कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे.

लातूर नगरपालिकेवर देशमुख घराण्याच्या वर्चस्वाने कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकत होता. मात्र आता महानगरपालिकेत कॉंग्रेसला दणका देत भाजपने एकहाती सत्ता मिळवत मराठवाड्यातील कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याचा बुरूज खिळखिळा केला. आमदार अमित देशमुख यांच्या राजकीय नेतृत्वाखाली कॉंग्रेसला लातूर जिल्हा परिषदेत पराभवाचा दणका बसल्यानंतर आता महानगरपालिकेतही भाजपने धोबीपछाड दिला. यामुळे लातूरचे पालकमंत्री व भाजपचा मराठवाड्यातील नव्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीच्या यशाचा आलेख उंचावला आहे. सामान्य नागरिकांशी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची तुटलेली नाळ, महानगरपालिकेतील ढिसाळ कामगिरी व भीषण दुष्काळात लातूरकरांचे झालेले हाल याबाबत अमित देशमुख यांच्यावरील नाराजी मतदारांनी कौलाद्वारे दाखविली.

मराठवाड्या नांदेड व लातूर या दोनच जिल्ह्यांत कॉंग्रेसची ताकद मजबूत असताना आता लातूर हा जिल्हा पूर्ण भाजपमय झाल्याने कॉंग्रेसला प्रचंड मोठा हादरा बसला आहे. भाजपच्या विजयाचे सर्वस्वी श्रेय पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांचेच असून, त्यांच्या रूपाने लातूरकरांनी देशमुखांच्या नेतृत्वाला झुगारत आता पाटील घराण्याच्या नेतृत्वाला स्वीकारल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायम लातूर शहर व जिल्ह्यात पक्षसंघटनेची ताकद मजबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र केवळ एका जागेवरच त्यांना यश आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणी महानगरपालिकेत मात्र या दोन्ही पक्षांना पराभवाचा दणका बसला. कॉंग्रेसने या महापालिकेत अनपेक्षितपणे सर्वाधिक जागा जिंकल्या. येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात लढत झाली. राज्यात भाजपची विजयी घोडदौड मात्र परभणीकर मतदारांनी रोखली. येथे भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला सहा जागा मिळाल्या.