लातूरला भाजप "झिरो टू हीरो'! 

लातूरला भाजप "झिरो टू हीरो'! 

लातूर - लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत लातूरच्या "देशमुख गढी'ला खिंडार पाडत भाजपने सत्ता हस्तगत केली. तेथे 70 पैकी 36 जागा भाजपने जिंकल्या. 65 वर्षांनंतर भाजप येथे प्रथमच सत्तेवर आला असून, गेल्या निवडणुकीत शून्य संख्याबळ असलेल्या या पक्षापुढे अन्य पक्षांचा सफाया झाला आहे. लातूरबरोबरच चंद्रपूरमध्येही 66 पैकी 36 जागा जिंकून भाजपने तेथील सत्ता कायम राखली. परभणीत मात्र सर्वाधिक 31 जागा जिंकलेल्या कॉंग्रेसला बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि "एमआयएम'चा धुव्वा उडाला. 

देशमुखांच्या गढीला खिंडार 
लातूर महापालिका निवडणुकीच्या 70 जागांसाठी आज झालेल्या मतमोजणीत भाजपने कॉंग्रेसपेक्षा तीन जागा जास्त मिळवून, सत्तेत प्रवेश केला. कॉंग्रेसची संधी थोडक्‍यात हुकली. शून्यावरील भाजपला 36 जागांचे घबाड लागले असून, कॉंग्रेसचे 16 जागांचे नुकसान झाले. कॉंग्रेसविरुद्ध भाजपच्या लढाईत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 12, शिवसेनेने सहा आणि रिपब्लिकन पक्षाने दोन जागा गमावल्या. महाराष्ट्र विकास आघाडी व "एमआयएम'च्या परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. 

लातूर महापालिकेच्या 70 सदस्यांच्या निवडीसाठी 18 प्रभागांची निवडणूक झाली. 401 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 70 पैकी 36 जागा पटकावून भाजपने बहुमत मिळविले. पूर्वीच्या सभागृहात भाजपचा एकही सदस्य नव्हता. 2014 मध्ये सुरू झालेली मोदी लाट ओसरली नसल्याचे दिसून येते. कॉंग्रेसने 33 जागांवर विजय मिळविला असला, तरी महापालिकेची सत्ता गमावली आहे. कॉंग्रेसचे 16 जागांचे नुकसान झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 13 पैकी एकच जागा परत मिळविली. त्यामुळे त्यांचे 12 जागांचे नुकसान झाले. शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही, त्यामुळे शिवसेनेचे सहा जागांचे नुकसान झाले. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) दोन सदस्य मागील सभागृहात होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा राखता आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश जागा कॉंग्रेसकडे; तर शिवसेनेच्या प्रभागांतील जागा भाजपकडे गेल्याचे दिसून आले. 

पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. त्यातही आमदार अमित देशमुख विरुद्ध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असा सामना रंगला. शून्यावरील भाजपने थेट सत्तेत प्रवेश केला, तर सत्तेतील कॉंग्रेसला तीन सदस्य कमी पडल्याने सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. 

चंद्रपुरात भाजपला स्पष्ट बहुमत 
चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 66 पैकी 36 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून, कॉंग्रेसला अवघ्या 12 जागांवर समाधान मानावे लागले. बहुजन समाज पक्षाने अनपेक्षितरीत्या मुसंडी मारत आठ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात केलेल्या विकासकामांमुळे मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्‍वास टाकला आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर कॉंग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासाठी ही निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची होती. 

निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला अनपेक्षित यश मिळाले. पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले. गेल्या निवडणुकीत बसपचा एकमेव सदस्य विजयी झाला होता. मात्र, दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट देऊन बसपने रिंगणात उतरविले होते. ही खेळी यशस्वी झाली. महापालिकेत भाजप 36, कॉंग्रेस 12, बसप 8, राष्ट्रवादी कॉंग्रेस 2, शिवसेना 2, मनसे 2, अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल आहे. 

परभणीत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष 
परभणी महापालिकेत सर्वाधिक 31 जागांवर विजय मिळवून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस 18 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप आठ जागांवर विजयी झाला आहे, तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या आहेत. 

परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी 418 उमेदवार रिंगणात होते. सकाळी अकरा वाजता प्रभाग आठचा पहिला निकाल हाती आला. यात सर्वच्या सर्व चार जागा कॉंग्रेसने जिंकत विजयाचे खाते उघडले होते. त्यानंतर एक-एक निकाल हाती येत गेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व 65 जागांचे निकाल हाती आले. यात कॉंग्रेस 31, राष्ट्रवादी कॉंग्रेस 18, भाजप आठ, शिवसेना सहा, तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले आहेत. 

सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष समोर आला असला, तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दोन नगरसेवकांची गरज भासणार आहे. विजयी झालेले दोन अपक्ष हे कॉंग्रेसचेच बंडखोर असल्याने ते कॉंग्रेससोबत जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निकाल घोषित होताच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी परभणी महापालिकेत कॉंग्रेसचा महापौर होईल, हे घोषित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com