भाजप घामाघूम

भाजप घामाघूम

मुंबई - लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राज्यात भाजपला संमिश्र यश मिळाले. भंडारा- गोंदियात विरोधकांना यश मिळाले, तर पालघरमध्ये शिवसेनेला नमवून भाजपने विजय संपादन केला. या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले, तर भाजपला रोखू शकतात हे चित्र स्पष्ट झाले. तसेच, शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेना भाजपला नक्‍कीच घाम फोडू शकेल, असा अंदाज पालघरमधील शिवसेनेच्या मतांच्या आकड्यावरून मांडता येईल. 

पालघरची ही प्रतिष्ठेची लढत जिंकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. पालघरच्या निकालाने भाजप- शिवसेनेतील संबंध आणखी कटू झाले असून, शिवसेनेला मित्रपक्षांची गरज नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, तर युतीसाठी आम्ही इच्छुक असलो तरीही शिवसेनेने ठरवावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने उमेदवार दिला होता, तर शिवसेनेने उमेदवार दिला नाही. या निवडणुकीत विरोधक सारे एकवटलेले होते. पालघरमध्ये पंचरंगी लढत झाली. यात भाजपचा विजय झाला. 

शिवसेना आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची झालेली पालघर लोकसभा पोटनिवडणूक अखेर भाजपने जिंकली असली, तरीही शिवसेनेने या मतदारसंघात भाजपला घाम फोडला आहे. शिवसेना अणि भाजपची मागील २५ वर्षांपासून युती असून, यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला असल्याने शिवसेनेने यापूर्वी केव्हाही पालघर लोकसभेची निवडणूक लढवली नाही. शिवसेनेने या मतदारसंघात पहिल्यांदाच पोटनिवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचीही ताकद आहे. यापूर्वी त्यांचा उमेदवार विजयी झाला आहे. या ठिकाणी पंचरंगी लढत झाली. या लढतीत भाजपचे काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला. गावित यांना दोन लाख ७२ हजारांच्या आसपास, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना दोन लाख ४३ हजारांच्या आसपास मते मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला दोन लाख २२ हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. गावित यांचा २९ हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे, तरीही शिवसेनेने या मतदारसंघात तुल्यबळ लढत दिली असल्याचे स्पष्ट होते.

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे तीन, भाजपचे दोन, तर शिवसेनेचा एक आमदार असे बलाबल आहे. मात्र, शिवसेनेचा जाणवण्याजोगा प्रभाव संपूर्ण मतदारसंघात दिसला. शिवसेनेने बोईसरमध्ये आघाडी घेतली, तर पालघर विक्रमगड या दोन मतदारसंघांत भाजपच्या मतांच्या जवळपास येण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. डहाणू मतदारसंघात शिवसेनेने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवून आश्‍चर्याचा धक्का दिला. वसई व नालासोपारा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची झालेली पीछेहाट हीच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली असे म्हणता येईल.

फडणवीस यांनी पुसला शिक्का
पोटनिवडणुकीत पराभव होण्याचा अपशकुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पुसला असल्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. एकीकडे उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना अपयशाला सामोरे जावे लागले असताना फडणवीस यांनी संमिश्र यश मिळवताना पालघरची प्रतिष्ठेची जागा जिंकली आहे.

आमच्या मित्रपक्षाने सुरवातीपासून लढायलाच नको होते. शिवसेनेबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे, त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, मी चर्चेला कधीही तयार आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पालघरमध्ये आम्ही भाजपला घाम फोडला आणि यापुढेही प्रत्येक निवडणूक स्वत:च्या ताकदीने लढू. मतमोजणीमध्ये घोळ असल्याने पालघरचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

भाजपची स्थिती
२०१४ नंतरच्या तेरांपैकी आठ पोटनिवडणुकांत भाजप पराभूत
निकालानंतर भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २७३ वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com