पाळणाघर घरात आणा

daycare center
daycare center

खारघर (नवी मुंबई) येथील "पूर्वा डे केअर' या पाळणाघरात 21 नोव्हेंबर रोजी आया अफसाना शेख हिने 10 महिन्यांच्या अजाण मुलीचे जे अनन्वित हाल केले, ते आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिले. 10 महिन्यांचे बाळ एवढे निरागस होते की, ते पुनः पुन्हा अफसाना या कैदाशिणीकडे पाहत होते! ही भाडोत्री राक्षसीण आपली अशी जीवघेणी काळजी का घेत आहे, हे त्या चिमुकलीला समजत नव्हते.

यावर खात्रीचा उपाय काय? पती व पत्नी या दोघांनाही नोकरी करण्याची गरज आहे, छोट्या बाळांना पाळणाघरात ठेवणेही भाग आहे. उपाय आहे, पाळणाघरच घरात आणणं हाच तो उपाय!

डोळ्यांचा पाळणा करून, नातवंडांची जीवापाड काळजी घेणारे आजी-आजोबा घरी हवेत. ज्या मुला-सुनांना व ज्या आजी-आजोबांना हे धडपड करून जमवता येईल, त्यांनी बाळाकरता ते जमवावेच जमवावे.

शहरात जागेची टंचाई आहे. परवडणारी राहती घरे काड्यापेटीच्या आकाराची म्हणजे वनरूम-किचन-टॉयलेट ब्लॉक एवढी किरकोळ असतात. अशा टीचभर घरात आजी-आजोबा, मुलगा-सून व छोटी नातवंडे मावणार कशी, राहणार कशी? पण या अडचणींवर मात करणारी कुटुंबे मी पाहिली आहेत.

जागेच्या अडचणीमुळे, मुलगा-सून-नातवंडे एका छोट्या नव्या घरात व आजी-आजोबा जुन्या छोट्या घरात; पण एकाच उपनगरात राहतात. नातवंडे बाळे असताना, वर्षानुवर्षे सकाळी मुलगा व सून नोकरीला निघण्यापूर्वी आजी-आजोबा मुला-सुनेच्या घरी बिनचूक हजर होत. दिवसभर आजी-आजोबा नातवंडांत रमत. संध्याकाळी मुलगा-सून परतल्यावर आजी-आजोबा स्वगृही परतत. वर्षानुवर्षे म्हणजे वर्षानुवर्षे! नातवंडे आपापल्या शाळेत एकट्याने जाण्याएवढी मोठी झाल्यावर शाळा सुटल्यावर आजी-आजोबांच्या घरी मुक्कामाला येत. आई-वडील नोकरीहून परतले की, नातवंडे घरी जात. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी असली की, नातवंडे आजी-आजोबांकडेच थांबत. नातवंडांना दोन घरेच झाली होती म्हणा ना?

वरील उदाहरण काहीच नाही. गिरगावचे एक आजोबा कमीत कमी 10 वर्षे तरी गिरगावाहून थेट मुलुंडमध्ये भल्या सकाळी लेक-जावयाच्या घरी बाळे असलेल्या नातवंडांकरिता हजर होत व लेक-जावई परतल्यावर गिरगावला परतत. वनरूम-किचनच्या ब्लॉकमध्ये राहणारे आजी-आजोबा, मुलगा-सून व नातवंडे अशी कितीतरी कुटुंबे पाहत मी 85 वर्षांचा झालो आहे. आजी-आजोबा हे असे आयुष्य मजेत आनंदात जगतात, कारण नातवंडांत त्यांचा जीव गुंतलेला असतो. बदलत्या परिस्थितीत आजी-आजोबांनी एक पथ्य पाळले पाहिजे. जीवनाच्या रंगभूमीवरचा आपला तिसरा व शेवटचा अंक हा मुलगा-सून-नातवंडे यांच्याकरिता आहे, या अंकात आपल्याला संवाद नाहीत, हे आजी-आजोबांनी मनाला समजावले पाहिजे. नातीला मित्र असतात, नातवाला मैत्रिणी असतात, हा आजकालचा सर्वसाधारण मैत्रीचा व्यवहार आजी-आजोबांच्या डोळ्यांना व मनालाही खुपता कामा नये. आजी-आजोबांनी सरळ, गोड शब्दांत, "सावधान' असा प्रेमळ इशारा एकदोनदा द्यायला हरकत नाही; पण एक दोनदाच!

"आम्ही दमलो आहोत, थकलो आहोत, आम्हांला विश्रांती हवी, आमच्या मागे घरच्या पाळणाघराची म्हणजे नातवंडांची कटकट कशाला?' हा खोटा विचारही आजी-आजोबांनी मनात आणता कामा नये. घरातल्या घरात नातवंडांवर, नातवंडे सांभाळणाऱ्या बाईवर नजर ठेवणं यात कटकट काय? बस-लोकल पकडणं, रोज नोकरीवर जाणं, वीज-टेलिफोनची बिलं भरणं, घरच्या दुरुस्त्या करणं, घर चालवणं ही कटकट आहे.

नातवंडांबरोबर राहायला मिळणं हे भाग्य आहे! आपले म्हातारपण हीच खरं तर घरच्या करता कटकट आहे. छोटी बाळे ही आजी-आजोबांकरता लडिवाळ औषधे आहेत. पुढच्या वयातील गुडघेदुखी, सांधेदुखी व मनाची मरगळ नातवंडांमुळं नक्की कमी होते.
आजी-आजोबा होणे म्हणजे मनाने मोठे होणे, दुसऱ्याशी जमवून, जुळवून घेणं, आपल्या चार आवडी बाजूला ठेवणं, मुलगा-सून-नातवंडे यांच्याकरता जगणं, पाळणाघर होणं हे काम यापैकी एक!

ज्या आजी-आजोबांना नातवंडांकरता पाळणाघर व्हायचं नसेल त्यांनी आजी-आजोबा या श्रीमंत व उच्च किताबावर हक्क सांगू नये, त्यांनी जीवनाच्या तिसऱ्या प्रवेशातही नवरा-बायको या खालच्या इयत्तेत आपल्याला ढकलावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com