मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी घेतली लाच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - प्राप्तिकर विभागाचे (अपील) आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद यांनी मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी विशाखापट्टणम येथे लाचेची रक्कम स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लाचेची रक्कम मुंबईहून हवाला नेटवर्कमार्फत नेण्यात आली होती. 

मुंबई - प्राप्तिकर विभागाचे (अपील) आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद यांनी मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी विशाखापट्टणम येथे लाचेची रक्कम स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लाचेची रक्कम मुंबईहून हवाला नेटवर्कमार्फत नेण्यात आली होती. 

अपिलावर अनुकूल निकाल देण्यासाठी दोन कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) प्रसाद व एस्सार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप मित्तल, एस्सार समूहातील एका कंपनीचा मुंबईतील लेखाधिकारी विपिन बाजपई, मे. जी. के. चोकसी या फर्मचा चार्टर्ड अकाउंटंट श्रेयस पारीख, बांधकाम व सराफ व्यावसायिक सुरेशकुमार जैन आणि त्याचा नातेवाईक मनीष जैन या सहा जणांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून दीड कोटीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. 

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॉर्पोरेशनशी संबंधित बालाजी ट्रस्टच्या एका अपिलाची सुनावणी प्रसाद यांच्यासमोर सुरू होती. ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रसाद यांनी दोन कोटींची मागणी केली. ही रक्कम ट्रस्टने मनीष जैन याच्याकडे द्यावी; ती त्याने विशाखापट्टणम येथे सुरेशकुमार जैन याच्याकडे पोचवावी, असे ठरले होते. 

लाचेचा प्रवास 
21 एप्रिल - प्रसाद यांनी ठरल्याप्रमाणे ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला. 
25 एप्रिल - सुरेश जैनने प्रसादसाठी सीए पारीखशी संपर्क साधून रक्कम तयार ठेवण्यास सांगितले. 
27 एप्रिल - विपीन वाजपेयीने मित्तलच्या सांगण्यावरून पारीखला लाचेची रक्कम दिली. त्याच वेळी पारीखने सुरेश जैनला पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्या वेळी झवेरी बाजार येथील मॉं अंबे ज्वेलर्सचा मनीष जैन पैसे घेऊन गेला. 
28 एप्रिल - पारीखने पुन्हा दूरध्वनी करून महालक्ष्मी येथील कार्यालयात येऊन पैसे नेण्यास सांगितले. मनीष पुन्हा रक्कम घेऊन गेला. त्या वेळी वाजपेयीने मनीष जैनला पैसे दिल्याची माहिती सुरेश जैनला दिली. 
1 मे - प्रसाद यांनी लाचेतील काही रक्कम देण्यास सांगितले. 
2 मे - सुरेश जैन याने ही रक्कम प्रसाद यांना आणून दिली. 

Web Title: Bribe to get married