"लक्षवेधी'ची उत्तरे न मिळाल्याने विरोधकांचा सभात्याग 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - लक्षवेधी सूचनांची उत्तरे उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेत मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला. चार-चार दिवस आधी सूचना देऊनही सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. 

मुंबई - लक्षवेधी सूचनांची उत्तरे उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेत मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला. चार-चार दिवस आधी सूचना देऊनही सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. 

विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत तीन लक्षवेधी सूचना दाखविण्यात आल्या होत्या. त्यातील पुण्यातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांच्या मृत्यूसंदर्भातील "लक्षवेधी'चेच लेखी उत्तर देण्यात आले होते. इतर दोन "लक्षवेधीं'चे उत्तर नव्हते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात येत असून, बुधवारच्या (ता. 8) कामकाजात त्या घेण्यात येतील असे जाहीर केले. सरकारच्या सर्व विभागांनी यापुढे "लक्षवेधीं'ची उत्तरे वेळेत येतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे-पाटील यांनी "लक्षवेधी'ची उत्तरे न मिळण्यास हरकत घेतली. लक्षवेधी सूचना चार दिवस आधी देण्यात येतात. तरीही वेळेत उत्तरे येत नाहीत हा सदस्यांवर अन्याय असल्याचे ते म्हणाले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अन्याय नाही तर सरकारला विषयाला पूर्ण न्याय द्यायचा होता. अधिक विस्तृत उत्तर देण्याचा सरकारचा प्रयत्न होता, असे सांगितले. या उत्तराने समाधान न झाल्याने त्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी सरकार गंभीर नसून, सभात्याग करीत असल्याचे सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी या वेळी सभात्याग केला. 

मद्यपी डॉक्‍टरांवर कारवाई करा 
मुंबईतील कूपर रुग्णालयातील तीन डॉक्‍टर हे कामावर असताना दारू पीत होते. ते दारू पिण्यात गर्क असल्याने आजारी असलेली लहान मुलगी तासभर उपचाराविना विव्हळत पडली होती. आपण स्वतः ही घटना पाहिली असून, या डॉक्‍टरांना सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी भाजपच्या आमदार भारती लव्हेकर यांनी विधानसभेत केली. 
भारती लव्हेकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. आपण रात्री कूपर रुग्णालयात गेले होते. तेव्हा तिथे एक लहान मुलगी तासाभराहूनही अधिक वेळासाठी उपचाराविना विव्हळत पडली होती. तिच्यावर उपचार का होत नाहीत अशी विचारणा केली असता तीन डॉक्‍टर दारू पित बसल्याचे मला दिसून आले. त्याचा जाब आपण विचारला असता मलाही उलट उत्तरे देण्यात आली. या सर्व प्रकरणाचे पुरावे आपल्याकडे आहेत. या तीन डॉक्‍टरांना तातडीने कामावरून काढून टाकावे, अशी मागणी भारती लव्हेकर यांनी केली.

Web Title: budget session