मध्यावधी निवडणुकांवरील खर्चापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या: उद्धव

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

एकजुटीला तडा जाऊ देऊ नका
शेतकरी संप आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकजुट दाखवली. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सरकारचे खेळ सुरूच राहतात. त्यामुळे शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी अशीच एकजुट ठेवावी. 

शेगाव : "शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी बुद्धी सरकारला येवो," अशी प्रार्थना आपण केल्याचे सांगत "शिवसेना कर्जमाफी मिळेपर्यंत शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहील. भाजप सने मध्यावधी निवडणुकांवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे," असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आल्यानंतर माध्यमांपुढे आपली भूमिका स्पष्ट केली. "सत्तेत असूनही सत्तेची पर्वा न करता पहिल्यापासून आम्ही उघडपणे शेतकऱ्यांसोबत राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना हा सत्तेतील असा एकमेव पक्ष असेल," असे त्यांनी सांगितले. 

ठाकरे म्हणाले, "मी कर्जमुक्त होणारच हे अभियान आम्ही सुरू केलेले असून, ते अभियान सुरूच ठेवणार आहे. या माध्यमातून सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लाभ शेतकऱ्यांना होत आहेत हे तपासले जाईल. कर्जमाफीच्या अंमलबजावणीची ताकद सरकारला द्यावी, अशी प्रार्थना गजानन महाराजांसमोर केली. 'साले' म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी, हाता-तोंडाशी आलेला घास वाया जाऊ देणार नाही. सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. "

एकजुटीला तडा जाऊ देऊ नका
शेतकरी संप आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकजुट दाखवली. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सरकारचे खेळ सुरूच राहतात. त्यामुळे शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी अशीच एकजुट ठेवावी.