श्रीनिवास वनगा यांची गत हर्षदा वांजळेंसारखी होणार नाही ना ?

can shrinvas vanga avoids wanjales experience
can shrinvas vanga avoids wanjales experience

आमदार किंवा खासदार यांचे पदावर असताना निधन झाले की त्यांच्या घरातीलच व्यक्तीला उमेदवारी देण्याची राजकीय पक्षांची परंपरा आहे. ती अपवाद वगळता आतापर्यंत पाळली गेली आहे. मतदारांनाही ही परंपरा आवडते, असं दिसून आले आहे. दिवंगत नेत्यांच्या घरातील उमेदवारांना मतदारांची सहानुभूती मिळते. तो सहज निवडून येतो. पण या उमेदवाराने संबंधित आमदार किंवा खासदाराचा मूळचा पक्ष बदलला तर...? 


श्रीनिवास यांनी आपल्या वडिलांचा मूळचा असलेला भाजप पक्ष बदलून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे. पक्ष बदलल्यानंतर मतदारांची सहानुभूती त्या वारसदार उमेदवाराला मिळते का, यासाठी महाराष्ट्रात यात गाजलेले उदाहरण आहे ते हर्षदा वांजळे यांचे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून "गोल्ड मॅन" रमेश वांजळे हे मनसेच्या चिन्हावर 2009 च्या निवडणुकीत निवडून आले. आपल्या विशिष्ट शैलीने त्यांनी अल्पावधीत चाहता वर्ग तयार केला होता. राज्यभर ते प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यांचे 10 जून 2011 रोजी आकस्मिक निधन झाले. ते नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले आणि हृदयविकाराचा झटका त्यांना आला. त्यांच्या चाहत्यांनाही तो धक्का होता. वांजळे यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून वांजळे यांच्या लोकप्रियतेविषयी अनेकांना खात्री पडली. 

वांजळे यांच्या निधनानंतर काही दिवस गेल्यानंतर साहजिकच पुढील पोटनिवडणुकीचा विषय निघाला. वांजळे यांच्या घरातील उमेदवार सहज निवडून येईल, असे वातावरण होते. त्यावेळी त्यांच्या घरातीलच उमेदवार मनसेप्रमुख राज ठाकरे हे देणार हे नक्की होते. फक्त ही उमेदवारी त्यांच्या पत्नी हर्षदा यांना की त्यांचे बंधू शुक्राचार्य यांना द्यायची हा पेच त्यांच्या कुटुंबात होता. पण हर्षदा यांनाच उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्‍चित होते. 

त्यानंतर अचानक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातले. वांजळे कुटुंबियांना राष्ट्रवादीकडून ऑफर दिली. हर्षदा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज भरला. तो अनेकांसाठी धक्का होता. राष्ट्रवादीसाठी हर्षदा वांजळे या उमेदवार असणे फायदेशीर होते. वांजळे यांच्या या अनपेक्षित निर्णयाने मनसे गडबडून गेली. मनसेचे तेव्हाचे आमदार राम कदम हे स्वतः त्यासाठी पुण्यात शिष्टाईसाठी आले होते. त्यांनाही दाद दिली गेली नाही. मनसेकडून दुर्लक्ष झाल्याची भावना वांजळे कुटुंबियांनी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा रस्ता धरल्याचे सांगण्यात आले होते. 

मतदारांना मात्र हा निर्णय आवडला नाही, असे दिसून आले. 2011 मध्ये झालेल्या पोनिवडणुकीत मनसेने उमेदवार उभा केला नाही. भाजपचे भीमराव तापकीर यांनी हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तापकीर हे निवडून येतील, असे सुरवातीला कोणालाही वाटत नव्हते. हर्षदा वांजळे यांनी पक्ष बदलल्याचे मतदारांना रूचले नाही. त्यांचा धक्कादायक पराभव झाला. 

आता तशीच परिस्थिती पालघरमध्ये आहे. आमचा उमेदवार शिवसेनेने पळविल्याचा आरोप भाजप करीत आहे. तर भाजपने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे वनगा कुटुंबियांचे म्हणणे आहे. शिवसेनेने वनगांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने मुख्यमंत्र्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपने तेथे राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येणे, ही चिंतामणी वनगांना श्रद्धांजली ठरेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वनगा यांनी या आदिवासी पट्ट्यात मोठा संघर्ष करत भाजप रुजवला आणि वाढवला. त्यामुळे येथील मतदार पक्षाला सहानुभूती दाखविणार की वनगांच्या कुटुंबाला हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com