उमेदवारांवरील गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - मतदान केंद्रांवरील फलकावर उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे; मात्र ही माहिती स्पष्ट असावी. उमेदवारावरील गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत की, गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे? हे स्पष्ट करावे, अशी विनंती ऍड. जयेश वाणी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

चांगले उमेदवार निवडून यावेत, यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र बरेच राजकीय कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींवर नोंदवण्यात आलेले गुन्हे राजकीय स्वरूपाचे असतात. संबंधित उमेदवार एखाद्या जनआंदोलनात सहभागी झाला असेल, तर त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 352 नुसार चिथावणी देणे किंवा कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा आणणे यांसारखे राजकीय गुन्हे दाखल असतात. मतदाराला कायद्याच्या कलमांची परिपूर्ण माहिती नसल्याने निवडणूक आयोगाने लावलेल्या फलकावरील एखाद्या उमेदवाराच्या नावासमोरची राजकीय गुन्ह्यांच्या माहितीची यादी वाचून तो उमेदवार अट्टल गुन्हेगार असल्याचा संभ्रम मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो. ही बाब टाळण्यासाठी आणि नागरिकांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या चांगल्या लोकप्रतिनिधींना या निर्णयाचा फटका बसू नये, असे निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात वाणी यांनी म्हटले आहे. मतदान केंद्रावर लावलेल्या फलकासोबत एफआयआरची प्रत जोडली, तर गुन्ह्याचे नेमके स्वरूप लक्षात येऊन निर्धास्तपणे मतदान करता येईल, याकडेही त्यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.