अरबी समुद्रातील पुतळा... या सम हाच!

Shiv Smarak
Shiv Smarak

मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन शनिवारी (ता. 24) होणार आहे. या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा साधारण 400 फूट उंच पुतळा राम सुतार तयार करणार आहेत. यासाठी दोन वर्षे दोन हजार कामगारांसोबत शिल्पकार सुतार मेहनत घेणार आहेत. त्यांनी मांडलेला दृष्टिकोन.

शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची रचना कशी असावी, त्याला कुठून सपोर्ट देता येईल याचा विचार प्रामुख्याने करावा लागला. शिवाजी महाराजांचे देशात अनेक पुतळे आहेत. यातील मीही अनेक पुतळे तयार केले आहेत; मात्र अरबी समुद्रातील स्मारकामधील हा पुतळा म्हणजे देशाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा ठरावा, असे सुरुवातीपासूनच मनात होते. त्यामुळे आजपर्यंत देशात कुठेही नसेल, असा पुतळा तयार करण्याचा विचार सुरू केला. म्हणूनच तो उभा पुतळा नसावा असे आधीच ठरवले होते. घोड्यावर बसलेला पुतळा जो डायनॅमिक असेल,

अनेकांना या पुतळ्यापासून प्रेरणा मिळेल आणि एकूणच महाराजांचे कार्य, त्यांची धडाडी, लढाऊ वृत्ती या पुतळ्यातून सर्वांना प्रेरणा देणारी असावी, असा विचार प्रामुख्याने केला होता. यासाठी महाराजांच्या उपलब्ध साहित्याबरोबरच घोडेस्वार, महाराष्ट्र, राजस्थानातील घोडे यांचा खूप अभ्यास केला. त्यानंतर हा घोडा, त्याची चाल नेमकी कशी असावी याबाबत निर्णय घेण्यात आला. या पुतळ्यात लढाई जिंकून उधळलेला वारू बनवण्याचा प्रयत्न आहे. या विजयी मुद्रेने मुंबईची स्कायलाईनच बदलून जाईल. तिला एक वेगळे परिमाण प्राप्त होईल. साधारण दोन वर्षे आमच्याकडे आहेत. रात्रंदिवस काम करावे लागेल.


नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. विविध प्रकारच्या पाच मशीनचा वापर केला जाणार आहे. हा पुतळा प्रामुख्याने ब्रॉन्झचा असेल. हा न गंजणारा आणि वर्षानुवर्षे टिकेल असा धातू आहे. आज ज्या काही पुरातन वस्तू आपल्याला उत्खननात मिळतात, त्या बहुतेक ब्रॉन्झच्याच असतात. चीनमध्ये असलेले बुद्धाचे भव्य पुतळेही याच धातूपासून बनवलेले आहेत. उंचावर सोसाट्याचा वारा वाहत असतो, हवामानाचाही परिणाम होतो, हे लक्षात ठेवून हे काम करणार आहोत. साधारण दोन हजार जण हे काम करतील. हे काम नॉयडामध्ये किंवा महाराष्ट्रातच फॅक्‍टरी उभारून करण्याचा विचार आहे. वेगवेगळे भाग तयार करून ते स्मारकात नेऊन जोडणी करावी लागेल.


सरकारने निविदा मागवल्या आहेत. कंत्राटदारासोबत आम्ही काम करू. फेब्रुवारी-मार्चमध्ये काम सुरू होईल आणि साधारण दोन वर्षांत हा भव्य पुतळा तयार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com