#votetrendlive मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एकहाती मोहिमेला यश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

शहरी व ग्रामीण भागातही भाजपची छाप

शहरी व ग्रामीण भागातही भाजपची छाप
मुंबई - दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपने शहरी तसेच ग्रामीण भागात आपली छाप पाडली आहे. सत्ताधारी असल्याचा फायदा, "आयारामां'ना पक्षाचे दरवाजे सताड उघडे, निवडूण येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकिटे, विकास आणि पारदर्शी मुद्याचा प्रचारात भडीमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा वापर करत भाजपने यश संपादन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या एकहाती मोहिमेचा हा विजय झाल्याचे मानले जाते.

नोटाबंदीनंतर झालेल्या नगर परिषदा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन करीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधकांवर मात केली होती. तोच कित्ता गिरवत भाजपने हे यश मिळवले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला आव्हान देताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांची मते घेत लक्षणीय कामगिरी केली आहे. अशाच प्रकारची कामगिरी नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला आदी महानगरपालिकांत तसेच जिल्हा परिषदांत भाजपने केली आहे.

फडणवीस यांनी राज्यातील भाजपचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर नगर परिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात क्रमांक एकचे यश मिळवून दिले आहे.
ग्रामीण भागात तसेच शहरी भागात पक्षाकडे उमेदवारांची वाणवा होती. त्यामुळे इतर पक्षातील "आयारामां'ना भाजपने पक्षात घेतले. त्यांना तिकिटे वाटप करीत सर्व प्रकारे मदत केली. त्याचा लाभ भाजपला झाला असल्याचेही सांगितले जाते. ग्रामीण भागात त्यांना यश मिळाले आहे. त्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जाते.

Web Title: chief minister of single handedly campaign success