झोपाळू मंत्र्यांवर मुख्यमंत्री संतापले 

झोपाळू मंत्र्यांवर मुख्यमंत्री संतापले 

मुंबई - तासनतास प्रयत्न करूनही मंत्री फोन उचलत नाहीत, हा सर्वसामान्य जनतेला नेहमीच अनुभव येत असतो; पण राज्यातील एका राज्यमंत्र्यांने चक्क मुख्यमंत्र्यांनाच या कार्यपद्धतीची झलक दाखवली. भर दुपारी हे मंत्री महाशय गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना फोन उचलता आला नाही. दोन तासांनंतर जागे झालेल्या मंत्री महाशयांनी मुख्यमंत्र्याचा मिस कॉल बघितला आणि त्यांची झोपच उडाली. महाशयांनी मुख्यमंत्र्यांना परत फोन केल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विशेष म्हणजे राज्यातील अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. 

राज्यात सर्वत्र निवडणूक प्रचाराचा धुरळा उडत आहे. मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत मंत्री राजे अंबरीशराव यांच्या डोळ्यावरील झापड उघडत नाही. एवढेच नाही, तर मागील दोन वर्षांत त्यांनी एकही समिती स्थापन केली नाही. कुठल्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या नाहीत. कधीही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून "ब्रिफिंग' घेत नाहीत. एवढेच नाही तर आमदार खासदारांना भेटण्यासाठीही त्यांना वेळ नसल्याचे स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांना सुरक्षेच्या कारणास्तव सूचना देऊनही रात्री अपरात्री राव नागपूरवरून अहेरीला (नक्षलग्रस्त भागात) रवाना होतात. महत्त्वाचे म्हणजे भाजपमध्ये पक्ष विलीन केला असूनही भाजपचा कुठेही नामोल्लेख न करता नाग विदर्भ जनआंदोलनाचाच प्रचार प्रसार ते करीत असतात. अशा तक्रारींची जंत्रीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचून दाखविल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

ऐन निवडणुकीत पालकमंत्री आणि पदाधिकाऱ्यांत मेळ नसल्याचे चित्र समोर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आणि मंत्री राजे अंबरीशराव यांना फोन लावला; पण बहुधा मंत्री महाशय नेहमीच्या कार्यक्रमात व्यग्र असल्याने मुख्यमंत्र्यांचाही फोन उचलला गेला नसल्याचे एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले. त्यामुळे मंत्र्यांच्या या कारभारामुळे राज्यात सर्वत्र यशाचा गड राखत घोडदौड करणाऱ्या भाजपला गडचिरोलीत मात्र अपयशाचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या सर्व बाबींवर प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही राजे अंबरीशराव यांच्याशी वारंवार फोन, 

व्हॉट्‌सऍप वरूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण आम्हालाही सर्वांप्रमाणेच अनुभव आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com