प्रयत्न करा शंभर टक्के! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

आज बालदिन. त्या निमित्त प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षयकुमारने बालकांशी विशेष पत्राद्वारे संवाद साधला आहे.... 

हॅलो लिटिल चॅम्प्स... 
मी अक्षयकुमार... तुम्ही सारे मला ओळखता ते ऍक्‍शनकुमार, अक्की, खिलाडी नं. वन अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी; पण माझं खरं नाव आहे राजीव भाटिया. तुमच्यासारखाच एक साधासुधा मुलगा होतो मी... पण एक सामान्य राजीव भाटिया सुपरस्टार अक्षयकुमार होऊ शकला तो तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि मी केलेल्या प्रयत्नांमुळे... जे मी नेहमीच जी-जानसे म्हणजेच 100 टक्के केले! 

तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. तुमच्यासारखाच मलाही अक्षयकुमार खूप आवडतो... अनेकांना कदाचित यामागचं खरं कारण नाही कळणार... पण आपण आपलं फेव्हरिट असायलाच हवं, तरच आपण आपल्या क्षमतांवर विश्‍वास ठेवू ना... आपल्याच मनात शंका असेल, तर प्रवास सुरू होण्याआधीच मोठा स्पीडब्रेकर ठरेल तो! अनेक रोल मॉडेल असतील तुमचे... तुम्ही बऱ्याच सेलिब्रेटींना किंवा रिअल हिरोंना फॉलो करतही असाल... तरीही मी तुम्हाला सांगतो, आधी स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न करा. स्वतःचं टॅलेंट जाणून घ्या. त्यासाठी हवी तर आई-वडिलांची मदत घ्या... पण नंतर मात्र इतरांवर विसंबून न राहता स्वतःच स्वतःला घडवा... विश्‍वास ठेवा, मीही तेच केलंय... 

तुमच्याएवढा असताना मीही खूप उनाडक्‍या केल्यात. माझे तर वडील लष्करात होते. अर्थातच कडक शिस्तीचे; पण उनाडक्‍या केल्या तरी वाहवत नाही गेलो. स्वतःला घडविण्यासाठी जे जे योग्य वाटलं ते ते केलं मी. अगदी हॉटेलमधला वेटरही बनलो. रिस्की समजल्या जाणाऱ्या "बॉलिवूड'मध्ये आलो. कुणीही गॉडफादर नव्हता. द लिजंड अमिताभ बच्चन अन्‌ इंडस्ट्रीतले तीन ग्रेट खान तेव्हा धडकी भरवत होते. चॅलेंज सोपं नव्हतं. अनेकदा अपयश आलं; पण निराश झालो नाही. वाटचाल सुरूच ठेवली मी. 

तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे, तुमचं ध्येय निश्‍चित करा आणि करा वाटचाल सुरू. अडचणी येतीलही कदाचित, पण थांबायचं नाही... कठीण वाटतंय का हे? अजिबात वाटू देऊ नका. योग्य नियोजन केलं ना तर काहीही कठीण नाही, त्यासाठी हवी तर मोठ्यांची मदत घ्या; पण एक लक्षात ठेवा, जेवढा अभ्यास कराल तितकीच मस्तीही करा. पण... तेवढं मोबाईलच्या जाळ्यात अडकू नका. आपल्यासाठी मोबाईल आहे. मोबाईलसाठी आपण नाही. खरं तर प्रत्येक सुखसोयीच्या वस्तूंनाच हा नियम लागू पडतो. तुमच्या वेळाचं योग्य नियोजन करून तो योग्य प्रमाणात अभ्यासात गुंतवा. बघा त्याचे "रिटर्न्स' किती पटींनी तुम्हाला मिळतील ते! आयुष्याची तिजोरी आनंदाने भरून जाईल तुमची. 

आणखी एक सांगतो, खूप खेळा, मैदानावर खेळा. तुमची जी असीम ऊर्जा आहे ना ती मैदानात वापरा. सचिन, धोनी, विराट, सानिया, सायना, सिंधू आणि गीता फोगट यांचे नुसते गोडवे गाऊ नका, त्यांच्यासारखं डेडिकेटेट अन्‌ फोकस्ड राहण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या छोट्याशा मुठीत अवघं विश्‍व असेल... 

आणि सर्वात महत्त्वाचं... अपयशाने कधीही खचू नका. कोणत्याही अपयशावर नक्कीच मात करता येते. त्या त्या वेळी ते अपयश आपल्याला खूप मोठं वाटूही शकतं; पण तुम्ही लगेच डिस्टर्ब होता. निराश होता. मागचा-पुढचा विचार न करता एखादा टोकाचा निर्णय घेता. अजिबात करू नका तसं. हे जीवन सुंदर आहे. ते अधिक सुंदर करणं तुमच्याच हातात आहे! त्यामुळे जर अस्वस्थ वाटलं, हतबल वाटलं तर मदत घ्या कोणाची तरी... पण अविचार कधीही करू नका. प्लीज, खंबीर राहा. 

तेव्हा स्वतःवर विश्‍वास ठेवा, स्वत:तल्या कलागुणांना ओळखा, आई-वडिलांशी मनमोकळा संवाद ठेवा आणि प्रयत्नांना  हंड्रेड पर्सेंट साथ द्या... मग यश तुमचंच आहे... 
बालदिनाच्या तुम्हा सर्वांना, खूप खूप खूप शुभेच्छा... 

तुम्हा सर्वांचा 
अक्षयकुमार