शहरांचा पुरवठा आजपासून रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाला एक वर्ष पूर्ण होत असताना उद्यापासून (ता. 1) दहा दिवस शहरांकडे जाणारा भाजीपाला अन्‌ दूध गनिमी काव्याने रोखण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकतातर्फे देशव्यापी पुकारण्यात आलेल्या संपासाठी राज्यातील विविध ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या उमटणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारे शहरांमध्ये थेट ग्राहकांना भाजीपाला-दूध विकण्याची व्यवस्था केली जाईल. 

पुणे-बंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, पुणे-नगर मार्गावरील शिरूर, पुणे-नाशिक मार्गावर चाकण, आळेफाटा, आंबीखालसा, संगमनेर, नाशिक जिल्ह्यातील विंचूर, नैताळे, येवला, चांदवडबरोबरच जळगाव, परभणी, लातूर, अमरावती, बीड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया या भागामध्ये भाजीपाला-दूध रोखले जाणार आहे. संपात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आणि डेअरींना दूध विकायचे नाही. त्याऐवजी 60 रुपये किलो भावाने भाजीपाला, 50 रुपये लिटर भावाने दूध थेट ग्राहकांना विकण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. शेतकरी संपामध्ये देशातील 170 संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

धरणे अन्‌ घेराव 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्‍वासन देऊनही राज्य सरकारने पाळले नाही. त्याविरोधात किसान सभेतर्फे उद्यापासून निदर्शने, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय किसान सभेतर्फे उद्या राज्यात तहसील कार्यालयाला घेराव आंदोलन करत शेतकऱ्यांच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

""पुणतांब्यामधून एक जून 2017 ला सुरू झालेले आंदोलन पहिले दोन दिवस शेतकऱ्यांच्या मुलांनी रेटले होते. त्यात खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील सहभागी झालेले नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गेल्या वर्षी ऐनवेळी उडी घेतली आणि ते शेतकऱ्यांचे मालक झाले होते. आता मात्र दोघांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला ते बरे झाले. आता त्यांना ऐनवेळी घुसून मालक होता येणार नाही.'' 
- संदीप गिड्डे पाटील (राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमेटीचे सदस्य) 

Web Title: city's supply will be stopped from today