शतप्रतिशत भाजपसाठी नव्याने योजना

शतप्रतिशत भाजपसाठी नव्याने योजना

मुंबई : राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ भाजपमय करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पक्षाच्या कोअर कमिटीने आखली असून 100 कठीण मतदारसंघातील नेते वश करण्यावर आता भर दिला जाणार आहे.

तीन महापालिकांमध्ये आज लागलेल्या निकालांनी भाजपचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले असतानाच 'शून्यातून कमळ फुलवण्याचा लातूर पॅटर्न' संपूर्ण राज्यात राबवण्याचे काटेकोर नियोजन तयार झाले असल्याचे समजते. 

महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य असलेले 48 भाजपेतर आमदार पक्षप्रवेशास उत्सुक असून, आणखी 100 जागा सध्या भाजपने लक्ष्य ठरवल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात खल करण्यात आला.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला सर्वाधिक बळ मिळाले असल्याने या दोन्ही राज्यांतील लोकसभा जागांमधील एकही जागा हातची जाऊ नये, यावर भर दिला जाईल. हे नियोजन शिवसेनेला सोबत घेऊन केले जाईल काय, असे विचारले असता एका ज्येष्ठ नेत्याने, दिल्लीत झालेल्या एनडीए ठरावाला शिवसेनेने अनुमोदन दिले असल्याने ते आमच्यासमवेत आहेत, असा विश्‍वास व्यक्‍त केला. मात्र त्याच वेळी स्वतंत्र पक्ष म्हणून विस्ताराचा विचार करावा लागतोच, असेही या नेत्याने नमूद केले. भाजप, शिवसेनेत नसलेल्या नेत्यांना सामावून घेणे, ते न आल्यास तेथे विस्ताराच्या कोणत्या योजना आखता येतील याचा विचार करण्यावर येत्या महिन्यात भर देण्यात येणार आहे. 

वसई विरार पट्ट्यातले भाई ठाकूरांसारखे नेते सध्या भाजपकडे खेचले जात आहेतच, अशांचे चरित्र आणि चिंतन पाहत त्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे समजते. पिंपरी- चिंचवड येथे बाहेरच्या मंडळींनी भाजपला विजयी करून दिले, त्याचप्रमाणे राज्यातल्या 100 मतदारसंघात पाय रोवले जातील. ठाण्यातील शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मित्रपक्षातील नेत्यांच्या क्षेत्रात कमळे फुलवणे हा सर्वांत आव्हानात्मक भाग मानला जातो आहे. 

घोषणांच्या अंमलबजावणीवर भर 
राज्यात सर्वदूर यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशी होईल, यावर आगामी एक वर्षात भर देण्याचे ठरविले आहे. सर्वांसाठी घरे किंवा मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती, ट्रान्स हार्बर लिंक, शिवस्मारक अशा महत्त्वाकांक्षी योजना 2019 पर्यंत साकार व्हायला हव्यात, यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मंत्र्यांनीही कारभार सुधारावा अशी अपेक्षा आहे. शासनाचे मानस चांगले असल्याचे जनतेला पटले आहे; पण पुढील दोन वर्षे अंमलबजावणीची असायलाच हवीत, असे फडणवीस यांचे मत आहे.

दरम्यान आज लागलेल्या निकालांनंतर मिनी विधानसभेतील 13 महानगरपालिकांपैकी भाजपने तब्बल 10 महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या संपर्कात असलेले 40 आमदार कोण ते मात्र कमालीचे गुप्त ठेवण्यात येणार आहे. या आमदारांना आत्ताच भाजपमध्ये घेण्याऐवजी विकासकामांकडे लक्ष देऊन योग्य वेळी 40 जणांना आपले म्हणण्याचा भाजपचा मनोदय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com