आदिवासींच्या जमिनीसंदर्भात समिती नेमणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील रामपूर येथील आदिवासींची जमीन बिगरआदिवासींनी खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या अडीच वर्षांत आदिवासी जमिनी विक्रीसंदर्भात जवळपास साडेचारशे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याला शासनाने मान्यता दिली नाही; परंतु यापूर्वी आदिवासींच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात शासनाने परवानगी कशी दिली आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आमदार सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रामपूर येथील सर्वे क्र.66.02 या जागेच्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.

आदिवासींच्या जमिनींचा विक्री व्यवहार करताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जमिनीचा लिलाव करून अधिकाधिक फायदा आदिवासी बांधवांना करून देता येईल, का याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असेही पाटील यांनी सांगितले.