छत्रपती शिवाजीं महाराजांच्या पुतळ्यावरून विधानसभेत रणकंदन

download.jpg
download.jpg

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी भलतेच विषय कशाला काढता, असे म्हटल्याच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाला.

विरोधकांनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. या गदारोळामुळे सभागृह चारवेळेस तहकूब करावे लागले. विरोधकांनी भातखळकर यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. भातखळकर यांनी माफी मागितली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी भातखळकर यांना यापुढे सभागृहात भान ठेवून बोलण्याबाबत समज दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. 

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर सभागृहात निवेदन केले. राज्य सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप केला. पुतळ्याची उंची साडेसात मीटरने कमी करीत तेवढीच उंची तलवारीची वाढविण्यात आली आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी भातखळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत कार्यक्रमपत्रिकेच्या व्यतिरिक्‍त भलतेच विषय कशाला काढता, असे वक्‍तव्य केले. या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ सुरू केला. 

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कोठेही कमी करण्यात आलेली नाही. समुद्रातील लाटा आणि हवेचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा आम्ही उभारणार आहोत. त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते सरकार देईल. दरम्यान, या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर धावून गेले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात आणि बाहेर येऊन घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. भातखळकर यांना किमान एका दिवसासाठी का होईना निलंबित करावे, अशी मागणी केली. तर, अजित पवार यांनीही ते वक्‍तव्य मनुवादी विचाराचे असल्याचा आरोप करीत निलंबनाची मागणी केली.

शिवसेनेच्या सदस्यांनीही जर अवमानजनक वक्‍तव्य केले असेल तर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर भातखळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, असल्याचे सांगत माफी मागितली. त्यानंतरही गदारोळ थांबत नव्हता. याबाबत अजित पवार यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करीत गटनेत्यांची बैठक घेण्यास मान्यता दर्शविली. या बैठकीनंतर विधानसभा अध्यक्षांनी भातखळकर यांना भान ठेवून बोलावे, अशी समज दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये. महाराजांबाबत काही उद्‌गार काढले असतील तर भातखळकर यांनी माफी मागावी.
 - सुनील प्रभू, आमदार, शिवसेना 

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा विषय हा भलता आहे की जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे, याचा निर्णय सभागृहाने घ्यावा. ज्या मानसिकतेने महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही त्या मानसिकतेचा कडाडून विरोध झाला पाहिजे. 
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com