पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये खांदेपालट?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

महाराष्ट्र प्रभारी, प्रदेशाध्यक्ष पदे बदलण्याची शक्‍यता

महाराष्ट्र प्रभारी, प्रदेशाध्यक्ष पदे बदलण्याची शक्‍यता
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांसह जिल्हापातळीवरही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

राज्यातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांसह चिंतन बैठक घेण्यात आली. या संदर्भातील अहवाल लवकरच हायकमांडकडे सुपूर्त केला जाणार आहे. या अहवालावरील चर्चेत अशोक चव्हाणांवर ठपका ठेवण्यात आला, तर त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाऊ शकते. या पदासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विदर्भातील माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. याबरोबरच राज्यातील निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांचीही उचलबांगडी होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद मिटविण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलेल्या भूपेंदर हुड्डा यांच्याकडे प्रभारी पद दिले जाऊ शकते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस नगरसेवकांची संख्या 52 वरून 31 वर घसरली आहे. या दारुण पराभवानंतर मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी तातडीने हायकमांडकडे राजीनामा दिला. याबाबतचा निर्णय फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेतला जाणार आहे. मुंबई प्रदेश अध्यक्षपदासाठी आमदार भाई जगताप आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा असली तरीही माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि माजी खासदार प्रिया दत्त यांचीही नावे रेसमध्ये आहेत.

संघटनेतील मोठ्या पदांसोबतच जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्येही खांदेपालट करून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: congress changes after defeat