विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' आघाडी

संजय मिस्कीन
रविवार, 15 जानेवारी 2017

मुंबई - राज्यात पाच जागांसाठी जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी निश्‍चित झाली आहे. यात औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ या एकमेव जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहमती दिली असून कोकण शिक्षक मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षासाठी सोडण्याची दोन्ही पक्षांची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात सध्या नाशिक व अमरावती या पदवीधर मतदारसंघांत निवडणूक होत आहे, तर नागपूर, औरंगाबाद व कोकण या शिक्षक मतदासंघांतही निवडणूक जाहीर झाली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात नुकतीच याबाबत चर्चा झाली होती.

अखेर, नाशिक व अमरावती पदवीधर तर नागपूर शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे, तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना कॉंग्रेस पाठिंबा देणार आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघातील अंतिम निर्णय झालेला नसला तरी येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्हा पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले. या मतदारसंघात शेकापकडून बाळाराम पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे.

नाशिक- नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना मैदानात उतरवण्याची जय्यत तयारी केली होती, तर याच मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी कॉंग्रेसने जाहीर केल्याने नात्या-गोत्याच्या राजकारणात ही निवडणूक रंगणार अशी चर्चा होती. अमरावतीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून कॉंग्रेसवासी झालेले संजय खोडके विरुद्ध रणजित पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. या पाचही मतदारसंघांत आघाडीच्या मतांची बेरीज अधिक असल्याने सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे.