शहरी, ग्रामीण मतदारांचा दोन्ही काँग्रेसना धोबीपछाड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली काँग्रेसव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका दहा महानगरपालिका व जिल्हा परिषदांतही सुरूच राहिली असून, आजच्या निकालाने तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे.

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली काँग्रेसव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका दहा महानगरपालिका व जिल्हा परिषदांतही सुरूच राहिली असून, आजच्या निकालाने तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. शहरातल्या मतदारांनी या दोन्ही पक्षांना अक्षरश: झिडकारले असून, गावखेड्यांतला करिष्माही आता संपत चालल्याचा कौल मिळाला आहे.

आज जाहीर झालेल्या महानगरपालिकांच्या निकालात या दोन्ही पक्षांची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून, कॉंग्रेसला केवळ 119 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 132 नगरसेवक निवडून आणता आलेले आहेत. सोलापूरसारखी अत्यंत महत्त्वाची महापालिका कॉंग्रेसच्या हातून गेली आहे, तर पिंपरी-चिंचवड व पुण्यातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकांत कॉंग्रेसला 264 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 265 जागा जिंकल्या होत्या.

मुंबई, नागपूर, अकोला, अमरावती, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर व ठाणे या सर्वच शहरांत कॉंग्रेसची वाताहात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा पटकावत विरोधी पक्षाची जागा मिळवली आहे.

नोटाबंदी नंतर या दोन्ही पक्षांनी भाजपवर कठोर टीका केली होती. मात्र, शहरी मध्यमवर्ग मतदारांमध्ये या दोन्ही पक्षांबाबत असलेली विश्‍वासार्हता संपल्यात जमा आहे. शहरी विकासाचा चेहरा नसल्याने या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसल्याचे मानले जाते.

ग्रामीण महाराष्ट्रातही या दोन्ही पक्षांना जबरदस्त फटका बसला आहे. सांगली व सोलापूर या पारंपरिक जिल्हा परिषदा भाजपकडे गेल्याने शक्तिस्थान असलेल्या भागातच भाजपच्या मुसंडीने दोन्ही पक्षांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

भाजपला दहा महापालिकांमध्ये 505 जागा मिळाल्या आहेत. 2012 मध्ये भाजपचे केवळ 205 नगरसेवक होते. शिवसेनेला 258 ठिकाणी यश आले आहे. 2012 मध्ये शिवसेनेचे 227 नगरसेवक होते.

Web Title: congress & ncp unsuccess