अस्वस्थ कॉंग्रेसमध्ये बंडाचे ढग 

congress
congress

मुंबई - स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे तेवढा आत्मविश्‍वास गमावून बसलेल्या कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत "कुरघोडी'ची संस्कृती कायम असल्याने प्रचंड अस्वस्थता पसरत आहे. याच अस्वस्थतेतून महाराष्ट्रातील कॉंग्रेसवर "बंडाचे ढग' जमा होऊ लागल्याचे संकेत आहेत. राज्यभरात कॉंग्रेसच्या बांधणीला अंतर्गत "वाळवी'ने ग्रासल्याची भावना बड्या नेत्यांनाही व्यथित करत असून, निष्ठावंत नेते बाळासाहेब थोरात यांनी त्याला वाट करून देण्याचा टोकाचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. 

नगरमध्ये बाळासाहेब थोरात, पुण्यात कलमाडी गटासोबत नाशिक, नवी मुंबईसह विदर्भातल्या अनेक नेत्यांमध्ये पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणाने प्रचंड असंतोष असल्याची माहिती आहे. कदाचित यातूनच राज्याच्या कॉंग्रेसमध्ये मोठे बंड होऊ शकते, असा दावा कॉंग्रेसमधील खात्रिलायक सूत्रांनी केला आहे. 

नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांत कॉंग्रेसची घसरण कायम राहिलेली असली तर भाजपपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या जागा त्यांनी पटकावल्या आहेत. मात्र, या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मूक असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीने आता बोलके रूप धारण केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी, तर थेट पक्षनेतृत्वावरच हल्लाबोल केल्याने प्रदेश कॉंग्रेसचे नेते अचंबित झाले आहेत. कॉंग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनुसार, सध्या पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचा ठाम दावा केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरच काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. युवक कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांचेही मनोबल कमालीचे खचलेले असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळच मिळत नसल्याचा आरोप होत आहे. 

बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीबाबत बोलताना कॉंग्रेसच्या खात्रिलायक सूत्रांनी सांगितले, की थोरात हे अत्यंत मवाळ नेते आहेत. निष्ठावंत आहेत. पण, या वेळी पहिल्यांदाच त्यांना संसदीय मंडळातून डावलण्यात आले. नगरपालिका निवडणुकांत स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांना स्थान दिले नाही. याउलट त्यांच्या स्वत:च्या संगमनेर मतदारसंघात स्वपक्षातील नेत्यांनीच पडद्याआड राहून घेरण्याचा प्रयत्न केला. पक्षातल्या कुरघोडीच्या राजकारणातून अकारण त्रास दिला जात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. 

या असंतोषाचा संपूर्ण रोषच प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्यावर आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून याबाबतच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने कोणत्याही क्षणी प्रदेश कॉंग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com