शिवस्मारकः जागेभोवती घोंगावणार वादाचे वादळ?

BMC
BMC

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कफ परेड येथील अरबी समुद्रातील भव्य प्रस्तावित शिवस्मारकाच्या जलपुजनाचे निमित्त साधून भाजपाने राज्यभर शक्तिप्रदर्शन सुरु केलेले असताना, स्थानिक मच्छिमारांचा या जागेला असलेला विरोध कायम असून, शिवसेनेसह संभाजी ब्रिगेड संघटनांनीही विरोधी सूर व्यक्त केला असल्याने, मच्छिमारांच्या आंदोलनात अन्य संघटनाही सहभागी होण्याची शक्‍यता गुप्तचर विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

कफ परेड, बधवार पार्क पासून खोल समुद्रात साडेतीन किलोमीटर अंतरांवर प्रस्तावित शिवस्मारकाच्या जलपुजनाची जय्यत तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारकडून केली जात आहे. या शिवस्मारकाचे श्रेय एकट्या भाजपाला मिळावे, यासाठी राज्यभरातील गडकिल्ल्यांची माती, नद्यांचे पाणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत आणण्याचे ठरविले असून, चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नरिमन पॉंईटपर्यंत रॅलीचे आयोजन केले आहे. 

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शिवस्मारकाचा जलपुजन सोहळा घेउन भाजपाने श्रेय घेण्याची रणनिती आखली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन गेले अनेक वर्षे राजकारणात कार्यरत असलेल्या शिवसेनेलाही पध्दतशीर बाजूला ठेवण्यात यश मिळविले आहे. गेल्या चार महिन्यात मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यानिमित्ताने आपणच शिवरायांचे कसे पाईक आहोत, हेही भाजप दाखवून देण्याचा प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, मच्छिमारांच्या आंदोलनाकडे फारसे महत्व न देणाऱ्या भाजप नेत्यांची आता झोप उडाली आहे.

'शिवस्मारकाला आमचा विरोध नसून, आमच्या रोजीरोटीचा प्रश्‍न असल्याने आम्ही जागेला विरोध करत आहोत. आम्हीही शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. शिवाजी महाराजांनी आरमार उभारली ते आम्हा कोळी आगरींच्या विश्‍वासावर. राज्य सरकारने महालक्ष्मी रेसकोर्स किंवा पालघर जिल्ह्यात शिवस्मारकांसाठी जागा निवडावी', अशी मागणी मच्छिमार कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. मच्छिमारांचे नेते दामोदर तांडेल, किरण कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांबरोबर राज्य सरकारच्यावतीने मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी बैठक घेतली होती. परंतु, कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली आहे. 

पंतप्रधान मोदीच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी ससून, माझगांव, गेट वे ऑफ इंडिया येथील सर्व मच्छीमारी नौक बंद ठेवून सुमारे पाच हजारहून अधिक मच्छिमार आंदोलनात उतरणार आहेत. या आंदोलनाला स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शेवटच्याक्षणी निमंत्रण देवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी केली. उध्दव ठाकरे यांनी मोदीसोबतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी, मच्छिमारांच्या प्रश्‍नांचा विचार व्हायला हवा अशी त्यांची भूमिका आहे. 

त्यात या जलपुजनाचा मान देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि सातारा येथील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही मच्छिमारांच्या मागण्याबाबत सहानुभूती दाखवली आहे. याबरोबर सध्या मराठा आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवस्मारकांची जागा दुसरीकडे हलवावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर मच्छिमारांची बाजू रास्त असल्याची भूमिकाही संभाजी ब्रिगेडने मांडली आहे. गोरेगांव जवळील राम मंदिर रेल्वे स्थानकांच्या उद्‌घाटनावरुन गुरुवारी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांच्या आंदोलनाला अन्य संघटनांचे बळ मिळाल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईत नरेंद्र मोदीचा कार्यक्रम यशस्वी करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्व परिक्षा ठरणार आहे. 

श्रेयासाठी "ट्‌विटर वॉर'
आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या जलपूजनाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी भाजपने सर्वच प्रसिद्धी माध्यमांमध्ये जोरदार जाहिरातबाजी सुरु केली आहे. मात्र, आघाडी सरकारच्या काळातच स्मारकासाठी जागा निश्‍चित करण्यात आली होती, असे सांगत राष्ट्रवादीने भाजपला रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या श्रेयवादाची लढाई सध्या ट्‌विटरवर चांगलीच रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवर शिवस्मारकाच्या जलपूजन सोहळ्याची माहिती टाकण्यात आली होती. यावर लागलीच माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ट्‌विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. "शिवस्मारकाची संकल्पना ही आमच्या सरकारची होती. जयंत पाटील हे समितीचे अध्यक्ष असताना, स्मारकासाठी जागा शोधण्याचे काम त्यांनी केले होते' अशा शब्दांत तटकरे यांनी ट्‌विटरवर मत मांडले आहे. आधीच स्मारकाच्या श्रेयावरुन भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण असताना आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतल्या कारणाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com