गर्दीत दुभंगतोय मराठा

गर्दीत दुभंगतोय मराठा
गर्दीत दुभंगतोय मराठा

क्षत्रिय, युद्धकर्ते, जमीनदार म्हणून मराठ्यांचा उल्लेख भूतकाळ आणि वर्तमान काळ अशा दोन्ही काळात केला जातो. जगातल्या लढवय्या जातींपैकी सर्वात प्रथम क्रमांक पटकावणारी जात मराठा असेही अनेक साहित्यात समोर आले आहे. पानिपतचे तिसरे महायुद्ध मराठे आणि अफगाणी सम्राट अब्दाली यांच्यात झाले. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे. "दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्‍चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्‍य‘! अशा खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा भारतावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. अशा वैभवसंपन्न अन देशाला संरक्षण देण्यासाठी धुळवडीचा गुलाल सोडून छावणी उद्गीरातून पानिपतावर टाकणाऱ्या मराठा समाजाचे वारसदार अस्पष्ट प्रवाहात वाहणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.

सोयीने आणि सुईने वापर...

मराठा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी मतांतरे आहेत तरीही सर्वात मान्यताप्राप्त उत्पत्ती म्हणजे

"मल्ल + रट्टा‘ अथवा "महा + रट्टा‘ या शब्दांच्या संयोगाने झाली असावे असे मानले जाते. इ.स. 850 ते इ.स. 1250 बेळगावनजीकच्या भागावर "रट्टा‘ नामक मुळ आफ्रिकन असणारे लोक राज्य करत होते. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धान्त मांडला. यातील रट्टा ही शक जाति. बहुतेक संशोधकांच्या मते मराठा हे "रट्टा‘ या जमातीचे वंशज होते असा हा वैभवसंपन्न समाज आज आरक्षणाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे इथे हे मान्य केले पाहिजे की जी संपन्नता मराठ्याकडे होती ती आज नाही. समाजाची राज्यातील लोकसंख्या 32 टक्के (अंदाजे आकडा) आहे. त्यापैकी उच्च शिक्षण घेणारे मराठे 12 टक्के आहेत. समाज आज आर्थिक अस्थैर्य आणि गर्दीत दुभंगला जाण्याची शक्‍यता आहे. सोयीने अन सुईने समाजाचा वापर जो तो करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. भारतीय व्यवस्थेत महिन्यात जेवढे खर्च करतो तेवढ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र निघत नाही. जेवढे लोक पुड्या-पाण्यात खर्च करत असतील तेवढे उत्पन्न प्रमाणपत्र निघते. अन दारिद्य्र रेषेतील लोक चारचाकी मधून फिरतात हे सत्य आहे. असा हा सारा सावळा गोंधळ एकीकडे अन त्यातून असत्याची असत्याशीच असणारी चढाओढ आजची खरी शोकांतिका आहे.
 

राजकीय रण

त्याच्याशी आज काही देणे नाही विषय एवढाच आहे की कोपर्डीच्या घटनेतील री धरून मराठे हल्ली गर्दी करण्याच्या चढाओढीत धावत आहेत आणि त्यात स्वहित विसरत आहेत काय याचा विचार करण्याची गरज आहे. काल परवा औरंगाबादला चांगले लाखभर लोक गोळा झाली. क्रांती दिनाचे औचित्य साधत जमा झालेली गर्दी कुणाचे राजकीय भांडवल ठरु नये, याची प्रचंड काळजी घेतली. मात्र त्याच गर्दीतून अनेकांना शकला सुचल्या आणि आपआपली राजकीय-सामाजिक आणि मानसिक मनसुबे बाहेर निघू लागली. राजकीय रण जिंकण्यास अनेक मराठा बाजीरावांच्या अन सरदारांच्या शमशेरी उपसल्या गेल्या आहेत. राजकीय कुरुक्षेत्रात आपल्या गढ्या शाबूत ठेवण्यासाठी वा मनातले किल्ले तडीस नेण्यासाठी मराठ्यांना भावनेत गुंफले जात आहे काय याचा विचार देखील करायला पाहिजे. नाहीतर कोपर्डीच्या आड ज्या वेदना आहेत त्या सामाजिक राजकीय पातळीवरून शासन अन् न्यायप्रणाली पातळीवर पाहिजे तेवढ्या तीव्रतेने पोहोचल्या आहेत. आज उज्वल निकम यांची नियुक्ती करत शासनाने संबंधित खटला गतिमान न्यायालयात चालवण्याचे घोषित केले आहे. आता याउपर कुठलाही समाज वा व्यक्ती कोपर्डीच्या गुन्हेगाराला सहानुभूती थोडी देत आहे, वा कुणी त्या घटनेचे समर्थन करतही नाही मग कोपर्डीचा हा आक्रोश जो रस्त्यावर सुनियोजित आणला जातो त्याची खरंच गरज आहे काय? याचा विचार कुणी जरी केला नाही तरी त्या मराठ्यांनी जरूर करावा जे या गर्दीत सामील होण्यास कर्तव्य समजतात. हल्ली निघणारे मोर्चे अन निषेध मेळावे हे चिथावणीखोरी ठरत आहेत की काय अशी भीती आहे. जातीय विसंवादाला हे मोर्चे कारणी पडले तर मराठ्यांना छत्रपतींचे वारस म्हणणे संयुक्तिक होईल का? म्हणून कुठल्या चार म्होरक्‍यांना सांगणे नाही. मात्र चार म्होरक्‍यांच्या सांगण्यावरून रस्ते जाम करणे अलगद एखादा दगड बस वर फेकणे हे प्रकार म्हणजे काही संघटन वा विधायक काम होऊ शकत नाही.

सामाजिक फुटीची शक्यता

आपण काही तरी खूपच मोठे आणि आद्यकर्तव्य पार पाडत असल्याचा समज भासवला जातो यात बळी पडण्याची काही गरज नाही, जे लोक यासर्व घडामोडीचे संचालन करतात त्यांच्याकडे संपूर्ण नियोजन असते. गर्दीतूनच अनेक राजकीय उत्कर्षाच्या वाटा आखल्या गेल्या आहेत, हे आपणास सांगायला नवीन नाही. कुणाच्या राजकीय लढा उत्कर्ष वा आंदोलनास आमचा विरोध नाही मात्र त्यासाठी सर्वसामान्य समाज भावनेच्या अडून वेठीस धरला जात असेल तर समर्थनीय होऊच शकणार नाही. ज्या धर्तीवर अन ज्या वातावरणात वर्तमानकाळात संघटना जातीय आवाहने करत गर्दीचे समीकरणे तडीस नेत आहेत त्यावरून कोपर्डी घटना काय जातीय निकष लावून झाली होती काय अशीच शंका घेण्यास उदुक्त केले जाते. म्हणजे पहा क्रूरतेला जात-धर्म नसतो असे शिकत आलेला समाज नराधमांना जातीय निकषात कसे घेऊ शकतो? म्हणजे अमुक जातीचा म्हणून कुणी नराधम नसतो आणि पिडीत अबला ही अमुक जातीचीच नसते म्हणून जात पुढे करून कुठला निषेध आक्रोश समर्थनीय नाही, यामागे कारण असे की यामुळे सामाजिक फुट होण्याची शक्‍यता असते आणि कोपर्डीवरून कमी अधिक झालेली आहे. अनेकदा समाजात चर्चा होतात की कोपर्डी ही एकच घटना घडली आहे का दुसऱ्या मुली त्यांचासाठी का मोठे मोर्चे निघत नाही. अशा प्रतिक्रिया ऐकल्या की मन सुन्न होतं,

चौकाचौकातली सरदार मंडळी

मंडल आयोगाच्या अहवालानुसार व्यवसाय आणि सामाजिक स्थान लक्षात घेता मराठा समाजाचे अनेक शतके वर्चस्व दिसते. ऐतिहासिक, सामाजिक तपशील पाहिल्यास मराठा समाजातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थान व्या शतकापासून उच्च होते. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही. याचे आकलन झाल्यानेच राणे समितीने मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्याची शिफारस केली. मागे आरक्षण मिळावे यासाठी रस्ते तुडुंब भरून वाहिले आणि त्यासाठीचा रिपोर्ट बनवताना राणे यांनी एकूण साडे अठरा लाख लोकांचे फक्त काही दिवसांत सर्वेक्षण करून हा अहवाल बनवला. या अहवालाच्या आधारे, निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घाईघाईने घेतला. तथापि, या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असाच काहीसा प्रकार नेहमी मराठा मानसिकतेत भूमिका घेताना होतो की काय अशी हल्ली शंका येते. कारण मराठा जातीला मानसिकरित्या जहाल राहिलेच पाहिजे असा स्वअटाहास असतो आणि असावाच अशी चिथावणारी सरदार मंडळी चौकाचौकात असतात. यातूनच मराठ्यांना रस्त्यावर आणणे आणि आपले इप्सित साध्य करून घेणे अनेकदा सहज शक्‍य झाले आहे यातूनच अनेकांना लोकशाहीच्या सभागृहात बिदागऱ्या लाभलेल्या आहेत, समाज होता तिथेच आहे ही शोकांतिका मात्र कुणाला दिसत नाही आणि त्यासाठी त्या पुढाऱ्यांना कुणी जाब विचारत नाही ही देखील एक शोकांतिका आहे. म्हणून ज्या छत्रपतींनी अठरापगड हिंदू मुस्लीम यांना आपल्या स्वराज्यात आणले मानापानाची पदे अन् आभूषणे दिली तिथे महाराजांच्या मराठ्यांनी कुणास का खिजवावे, हीच श्रीची इच्छा होती याचा विचार करावा.

गर्दीत हरवत चाललेला मराठा

मराठा समाजाने संघटन वा शक्तीप्रदर्शन करू नये असे माझे मत अजिबात नाही मात्र त्यासाठी समाजात दुही आणि सामाजिक तेढ निर्माण करतील असे मुद्दे पुढे करून गर्दीचा अट्टाहास नको आहे. कोपर्डीची घटना अत्यंत किळस आणि निंदा करावी अशीच आहे मात्र त्या नंतर आणि त्या पलीकडे त्या घटनेचे राजकीय भांडवलीकरण होणे आणि त्याचे मराठा समाजाकडून अंधानुकरण होणे हे सुद्धा काही समर्थनीय नाही. म्हणून गर्दीत हरवत चाललेला मराठा आपल्या वैभवात आणि वर्तमानात दुभांगतोय .....एवढेच!

या विषयावर आपणही आपले मत लेख स्वरुपात मांडू शकता. योग्य लेखांना ‘ई-सकाळ‘वर प्रसिद्धी दिली जाईल. त्यासाठी -

  • आपले लेख webeditor@esakal.com या ई-मेलवर पाठवा.
  • सब्जेक्‍ट बॉक्‍समध्ये ‘गर्दीत दुभंगतोय मराठा‘ असे लिहा.
  • लेख शक्‍यतो युनिकोड फॉरमॅटमध्ये पाठवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com