नोटा बंदच्या निर्णयाचे कार्तिकी वारीवर परिणाम 

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पंढरपूर - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीपासून 500 आणि एक हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे पडसाद पंढरपूरमध्ये भरलेल्या कार्तिकी वारीवरतही उमटले. ऐन यात्रेदरम्यान हा निर्णय झाल्याने भाविकांची आर्थिक कोंडी झाली आहे. शहरातील व्यापाऱ्यांबरोबरच यात्रेसाठी आलेल्या छोट्या-मोठ्या दुकानदारांच्या व्यवसायांवर देखील याचा थेट परिणाम झाला आहे. 

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आले आहेत. बुधवारी हॉटेल व इतर दुकानांमध्ये गेलेल्या भाविकांकडे दुकानदारांनी सुट्या पैशांची मागणी केली. त्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली. दरम्यान, सुटे पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून भाविक आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकारदेखील झाले. तर दुसरीकडे या संधीचा गैरफायदा घेत काही दुकानदारांनी चहा, नाश्‍ता आणि पाण्याच्या बाटलीसाठी 200 ते 300 रुपये घेतल्याची चर्चादेखील भाविकांमध्ये होती. 

यात्रा काळात भाविकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी श्री विठ्ठल मंदिर समितीने सुटे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

जनावरांच्या बाजारातील उलाढाल ठप्प 

कार्तिकी जनावरांच्या बाजारात या वर्षी मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने येथील जनावरांच्या बाजारातील आर्थिक उलाढालीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. बाजारात अनेक व्यवहार हे उधारीने होण्याची शक्‍यता असल्याचेही येथील व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले. 

कार्तिकी यात्रेसाठी येताना आम्ही 500 आणि एक हजाराच्या नोटा आणल्या आहेत. परंतु अचानक या नोटा रद्द झाल्यामुळे कोणीही दुकानदार नोटा घेत नसल्याने चहा, पाणीसुद्धा मिळणे मुश्‍किल झाले आहे. शासनाने यात्रेमध्ये भाविकांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. 

- शशिकला जाधव, भाविक, पुणे