"डार्क नेट'द्वारे "इसिस'च्या संपर्कात 

"डार्क नेट'द्वारे "इसिस'च्या संपर्कात 

मुंबई - नागपाड्यातील तरुणाचे माथे भडकवणारा अब्दुल रशीद अब्दुल्ला हा "डार्क नेट'च्या माध्यमातून "इसिस'च्या सदस्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात पुढे आली आहे. नागपाड्याचा अश्‍फाक अब्दुल माजिद (वय 25) "इसिस' या प्रतिबंधित संघटनेत सामील होण्यासाठी देशाबाहेर गेला होता. त्याचे कथित "ब्रेनवॉश' करणाऱ्या अर्शी कुरेशीसह "एनआयए'ने आरोपी अब्दुल रशीद अब्दुल्ला याच्याविरोधातही आज विशेष न्यायालयात आरोपपत्र केले. 

"एनआयए'च्या आरोपपत्रानुसार, अब्दुल्लाने केरळातील मल्लापुरम जिल्ह्यात "पिस ऑफ लॅंड' नावाने जहाल मतप्रवाह पसरवण्यासाठी तरुणांना घेऊन शेती सुरू केली होती. तेथे तो कथित स्वरूपात या तरुणांसोबत "इसिस'च्या विचारसरणीबाबत चर्चा करायचा. तसेच सामूहिक मानववधाचे चित्रीकरणही दाखविले जात होते. विशेष म्हणजे या वेळी तो कथित स्वरूपात "डार्क नेट'च्या माध्यमातून "इसिस' सदस्यांच्या संपर्कात असल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

"डार्क नेट' काय आहे? 
"डार्क नेट' हा इंटरनेटवरील एक काळा बाजार आहे. ज्या गोष्टी सामान्य इंटरनेटमध्ये वापरायला बंदी (बेकायदेशीर) आहे, त्या गोष्टी आपल्याला "डीप नेट ऍक्‍सेस'च्यामध्ये वापरायची सुविधा मिळते. "डार्क नेट'मध्ये आपले लोकेशन ट्रेस होत नाही. त्यामुळे काळा धंदा व बेकायदेशीर कारवाया करणारे "डार्क नेट'ला पहिली पसंती देतात. दहशतवादी याच माध्यमाचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधतात. नियमित ब्राउजरवरून काही अनधिकृत गोष्टी सर्च (शोधल्या) केल्या, तर पकडण्याची शक्‍यता असते; पण "डार्क नेट'साठी वेगळे ब्राउजर्स उपलब्ध आहेत. 

चार्ली हेब्दो हल्ल्याचे समर्थन 
आयएसआयएसप्रकरणी एनआयएने वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा (आयआरएफ) कर्मचारी अर्शी कुरेशी याच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात अब्दुल्ला त्याच्या भाषणात फ्रान्समधील चार्ली हेब्दो हल्ल्याचे समर्थन करायचा. 2006 मध्ये चार्ली हेब्दोने वादग्रस्त व्यंग्यचित्र प्रसिद्ध केल्यानंतर 2015 मध्ये या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. 

श्रीलंकेतही पसरवण्याचा प्रयत्न 
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात नागपाड्याचा अश्‍फाक याने धार्मिक शिक्षणासाठी 28 फेब्रुवारी 2016 ला श्रीलंकेतील अल दूर स्लफिया या ठिकाणाला भेट दिली होती. त्या वेळी तेथे शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये आयएसआयएसची विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण हा प्रकार तेथील शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने अश्‍फाकला तेथून पळवून लावले. त्यानंतर एप्रिल 2016 मध्ये अश्‍फाक देशात परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com