साम, दाम, दंड, भेदाचा वापर करा; मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ऐकवलेल्या ध्वनिफितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाज आहे. आरे ला कारे करा. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करा अशा सूचना या आवाजात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप श्रोत्यांना ऐकवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामध्ये साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ऐकवलेल्या ध्वनिफितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाज आहे. आरे ला कारे करा. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करा अशा सूचना या आवाजात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ही ऑडिओ क्लिप टॅम्पर केलेली असून याबाबत शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांशी बोलताना सांगितले. खरी ऑडिओ क्लिप उद्या भाजपतर्फे जाहीर करू. या क्लिपमध्ये मोडतोड केली आहे, असा दावाही महाजन यांनी केला आहे. 

पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अशा प्रकारची अर्धवट ऑडिओ क्‍लिप ऐकवली जात आहे. तंत्रज्ञानाचा निषेधार्ह गैरवापर असून या संदर्भात उद्या निवडणुक आयोगाकडे तक्रार करुच त्याच बरोबर खरी क्‍लिप भाजप जाहीर करेल, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. तर, ठाकरे यांनी जबाबदारीने ही क्‍लिप जाहीर केली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला.  

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिपमधील वक्तव्ये : 
"एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा,  साम, दाम, दंड, भेद ! ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं.' अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

Web Title: Devendra Fadnavis audio clip declared by Uddhav Thackeray in Palghar