स्थानिक निवडणुकीत शिवसेनेचेच अधिक नुकसान: मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अस्थिर आहे का? आणि भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन घेणार का, असा प्रश्‍न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनाबाबत अनेक अफवा आहेत. उलटसुलट राजकीय चर्चाही अधूनमधून होतात. त्यात काडीमात्र तथ्य नाही. राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चाही नाही. 

मुंबई : गेल्या वर्षभरात झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिल्याचे दिसून आले असताना सत्तेत असूनही शिवसेनेचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सकाळ' ला दिली.

शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अस्थिर आहे का? आणि भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन घेणार का, असा प्रश्‍न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनाबाबत अनेक अफवा आहेत. उलटसुलट राजकीय चर्चाही अधूनमधून होतात. त्यात काडीमात्र तथ्य नाही. राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चाही नाही. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत; मात्र पक्ष म्हणनू शिवसेनेची भूमिका योग्य नाही. शिवसेनेला सत्तेत राहून सत्ताधारी आणि विरोधक अशी दुहेरी भूमिका बजावायची असल्याने त्या पक्षाचे राजकीय नुकसान होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नांदेड आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, नांदेडमध्ये आमच्या मतांची टक्‍केवारी वाढली आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षभरात झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला असताना शिवसेना सत्तेत असूनही त्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते,  त्याला त्यांची दुटप्पी भूमिका कारणीभूत आहे, अशी टीका करताना राजकारणात कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षाला संपवू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.